कल्याण : कल्याण-शिळफाटा रस्त्यावर गोळवली गावाजवळील प्रवेशव्दारासमोर मुख्य वर्दळीच्या काँक्रीटच्या रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामधील लोखंडी सळया बाहेर आल्या आहेत. या सळ्या वाहनांच्या टायरला अडकून मोठा अपघात होण्याची भीती या भागातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दुचाकी स्वार मुसळधार पाऊस सुरू असताना किंवा रात्रीच्या वेळेत या भागातून जाताना या सळ्यांवरुन गेला तर दुचाकीचे चाक सळ्यांमध्ये अडकून अपघात होईल. त्याशिवाय इतर वाहनांना, पादचाऱ्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मागील काही महिन्यांपासून गोळवली गावाजवळील प्रवेशव्दारासमोरील शीळ रस्त्यावर खड्डा पडून काँक्रीटमधील सळ्या बाहेर आल्या आहेत. याची माहिती गोळवली, डोंबिवलीतील काही नागरिक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अभियंत्यांना मोबाईलव्दारे देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, एमएसआरडीसीचे अधिकारी संपर्काला प्रतिसाद देत नाहीत, अशी माहिती डोंबिवलीतील रहिवासी डाॅ. शोभा साळुंखे यांनी दिली.
हेही वाचा >>> डोंबिवली, कल्याणमधील खड्ड्यांनी प्रवासी हैराण
शिळफाटा रस्त्यावर २४ तास वाहनांची येजा सुरू असते. रात्रीच्या वेळेत वाहने या रस्त्यावरुन धावत असतात. अनेक वेळा या भागातील वीज पुरवठा खंडित असतो. पथदिवे बंद असतात. अशा परिस्थितीत रस्त्यामधून बाहेर आलेल्या सळ्या वाहन चालकाच्या निदर्शनास आल्या नाहीतर अपघात होण्याची शक्यता आहे, असे डाॅ. साळुंखे यांनी सांगितले.
हेही वाचा >>> कल्याण: नालंदा विद्यालयातील शिक्षिकेने केली बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक
वाहतूक पोलिसांनी हा धोका ओळखून सळ्या निघालेल्या भागात डांबर, खडी टाकली होती. परंतु, डांबर आणि काँक्रीट यांचे मिश्रण होत नसल्याने वाहनांच्या वर्दळीमुळे डांबर निघून गेली आहे, असे या भागातील व्यापाऱ्यांनी सांगितले. अनेक वेळा दुचाकी स्वार या लोखंडी सळ्यांना अडखळतो पण तो वेळीच दुचाकीचा वेग कमी करतो त्यामुळे बचावतो, असेही या भागातील रहिवासी म्हणाले. या सळ्यांच्या आजुबाजुला अडथळे उभे केले तर वाहनांना अडथळा निर्माण होतो, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी तंत्रशुध्द पध्दतीने हा काँक्रीटचा खड्डा भरावा आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.