लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली : येथील पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळील नवीन रेल्वे आरक्षण केंद्राच्या बाहेर अनेक दिवसांपासून वर्दळीच्या महात्मा गांधी रस्त्यावर लोखंडी खांब, लोखंडी पट्ट्या आणून ठेवण्यात आहेत. रिक्षा उभ्या करण्याच्या ठिकाणी हे सामान ठेवण्यात आल्याने रिक्षा चालक आणि प्रवाशांची याठिकाणी घुसमट होत आहे.

डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील विष्णुनगर मासळी बाजारासमोरील महात्मा गांधी रस्त्यावर हे सामान ठेवण्यात आले आहे. हे सामान कोणी आणून ठेवले आहे याविषयी कोणाला काही माहिती नसल्याने तक्रार करायची कोणाकडे असा प्रश्न पादचारी, रिक्षा चालकांना पडला आहे. रेल्वे स्थानक भागातील हा रस्ता अरूंद आहे. डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर, सरोवरनगर, देवीचापाडा, गरीबाचापाडा भागातून रिक्षेने येणारे प्रवासी या रस्त्यावर रेल्वे स्थानकात जाण्यासाठी उतरतात. लोखंडी सामानामुळे रिक्षा चालकांना वाहन रस्त्याच्याकडेला घेता येत नाही. प्रवाशांना रिक्षेतून उतरताना या सामानाचा अडथळा होतो. जड वाहने या रस्त्यावरून धावतात. या वाहनांना लोखंडी सामानाचा अडथळा येतो.

आणखी वाचा-स्थलांतरीत पक्ष्यांची जिल्ह्याकडे यंदाही पाठ, डोंबिवलीतील मुख्य ठिकाणी मोजक्याच पक्ष्यांची नोंद, वसईत १२८ प्रजातींची निरीक्षकांडून नोंद

लोखंडी पट्ट्या रस्त्यावर पसरून ठेवण्यात आल्या आहेत. या पट्ट्या गुळगुळीत असल्याने या पट्ट्यांवरून जाणारे प्रवासी दररोज पाय घसरून पडतात. हे सामान रस्त्यावरून हलविण्याची रिक्षा चालकांची मागणी आहे. पण हे सामान याठिकाणी कोणी, कधी आणून ठेवले आहे. याची कोणतीही माहिती नसल्याने तक्रार कोठे करायची, असा प्रश्न रिक्षा चालकांना पडला आहे. अनेक प्रवासी या रस्त्यावरील लोखंडी सामानाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

मालवाहू अवजड वाहन लोखंडी सामान ठेवलेल्या रस्त्यावर आले तर या भागातून ते वाहन पुढे नेताना चालकाला कसरत करावी लागते. या कसरतीमध्ये या रस्त्यावर दररोज कोंडी होत आहे. वाहतूक पोलीसही हे सामान ठेवणाऱ्याचा शोध घेत आहेत. डोंबिवली पश्चिमेतील रस्ते वाहतूक विभागाने एक दिशा करून वाहतुकीत सुसुत्रता आणण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी रस्त्यावरील लोखंडी सामानाने मात्र पादचाऱ्यांसह वाहन चालकांची कोंडी केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iron goods near dombivli west railway station obstructing traffic mrj