लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: कल्याण-ठाकुर्ली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वे मार्गा जवळ किलोमीटर अंतर दर्शविणारा एक टोकदार लोखंडी दिशादर्शक रेल्वे रुळाच्या बाजुला लावण्यात आला आहे. हा दिशादर्शक दरवाजात बेसावधपणे उभ्या असणाऱ्या प्रवाशासाठी धोकादायक आहे. त्यामुळे तो ताबडतोब काढून टाकावा, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून करण्यात आली आहे.

मागील अनेक महिने लोखंडी खांबाला सरळ दिशेत असलेला हा किलोमीटर अंतर दर्शविणारा दिशादर्शक स्क्रु सैल झाल्याने तिरपा झाला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेत रेल्वे मार्गाच्या कडेने जाणाऱ्या प्रवाशालाही त्याचा फटका बसू शकतो, असे प्रवाशांनी सांगितले.

आणखी वाचा- मौजमजेसाठी शाळेला दांडी मारून गाठले गोवा; अंबरनाथच्या शालेय विद्यार्थ्यांचा प्रताप

ठाकुर्ली रेल्वे स्थानका जवळील खंबाळपाडा येथील गावदेवी मंदिरा जवळील रेल्वे मार्गालगत हा किलोमीटर अंतर दर्शविणारा दिशादर्शक आहे. लोकलमध्ये दरवाजात लटकून अनेक प्रवासी, तरुण मुले प्रवास करतात. त्यांच्यासाठी हा दिशादर्शक घातक आहे. काही दुर्घटना घडण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने हा किलोमीटर अंतर दर्शविणारा दिशादर्शक काढून टाकावा, अशी मागणी प्रवाशांची आहे. काही जागरुक प्रवाशांनी यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत.

Story img Loader