लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढविण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेने तयारी सुरू करत पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडका लावला असतानाच, दुसरीकडे भाजपने ठाणे लोकसभा मतदार संघाचा जनसहभागातून जाहिरनामा तयार करण्यास सुरूवात करून या मतदार संघावर एकप्रकारे दावाच केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत.
ठाणे लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व यापुर्वी रामभाऊ म्हाळगी, राम कापसे या अभ्यासू खासदारांनी केले. एकेकाळी भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदार संघ पुढे युतीच्या जागावाटपामध्ये शिवसेनेच्या वाट्याला गेला. हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात गेल्याची सल अजूनही भाजपच्या जुन्या जाणत्यांच्या मनात कायम आहे. गेल्या काही वर्षात भाजपची मतदार संघात पुन्हा ताकद वाढल्याचे चित्र दिसून येत असून त्याचबरोबर शिवसेनेतील उठावानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. यामुळे भाजपकडून हा मतदार संघ काबीज करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यातूनच शिवसेना आणि भाजप या दोन्ही मित्र पक्षांच्या नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. या मतदार संघातून कोणता पक्ष निवडणूक लढणार याविषयी दोन्ही पक्षांचे नेते उघडपणे बोलणे टाळत असले तरी त्यांनी या मतदार संघातून निवडणुक लढविण्याची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
आणखी वाचा-आमदार असल्याची बतावणी करून लुटले अंबरनाथमधील प्रकार, महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल
शिंदेच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी ठाणे लोकसभा मतदार संघातील विभागप्रमुख, शाखाप्रमुख अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरू केले आहे. एकीकडे शिंदेच्या शिवसेनेच्या बैठकांचा धडाका सुरू असतानाच, दुसरीकडे भाजपनेही या मतदार संघात निवडणुक लढविण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. भाजपने काही महिन्यांपुर्वी ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या संयोजकपदी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांची नियुक्ती केली असून त्यांनी जनसहभागातून या मतदार संघाच्या निवडणुकीचा जाहिरनामा करण्याची घोषणा गुरूवारी केली आहे. यासाठी त्यांनी एका संकेतस्थळांचे अनावरणही केले. या माध्यमातून मतदारांपर्यत पोहचण्याची तयारी भाजपकडून सुरू आहे. या जाहिरनाम्याच्या निमित्ताने भाजपने एकप्रकारे या मतदार संघावर दावा ठोकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
आणखी वाचा-मुंबई -नाशिक महामार्गावर शेतीचा माल वाहून नेणाऱ्यांना चाकू हल्ला करत लुटले
ठाणे लोकसभा मतदार संघाचा विकास व्हावा यासाठी जनसहभागातून निवडणुकीचा जाहिरनामा तयार करण्यात येणार आहे. राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांवर महायुती निवडणुक लढविणार आहे. या युतीमध्ये भाजपही घटक पक्ष आहे. तसेच कोणत्या मतदार संघातून कोणता पक्ष निवडणुक लढविणार हे वरिष्ठ ठरवतील. -विनय सहस्त्रबुद्धे, भाजप, ठाणे लोकसभा मतदारसंघ संयोजक
राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा जिंकण्याचे महायुतीचे मिशन आहे. त्यासाठी महायुतीमधील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष आपल्यापरीने काम करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा पंतप्रधान होणार आहेतच. पण, त्यात ठाण्याचाही वाटा असावा, यासाठी आम्ही सर्वजण काम करीत आहोत. त्यामुळे उमेदवार कोण हे आमच्या दृष्टीने महत्वाचे नाही. परंतु गेली अनेक वर्षे ठाणे लोकसभा मतदार संघातून शिवसेना निवडणूक लढवीत असून ही जागा आम्हाला मिळावी अशी आमची इच्छा आहे. -नरेश म्हस्के, शिवसेना, ठाणे जिल्हा प्रमुख