लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : महिन्याच्या दहा तारखेच्या आत होणारे ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांचे मार्च महिन्याचे निवृत्ती वेतन एप्रिल संपत आला तरी न मिळाल्याने सेवानिवृत्त शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सेवानिवृत्त शिक्षकांच्या निवृत्ती वेतनाची तरतुद शासनाने अगोदरच केलेली असताना, वेळोवेळी सेवानिवृत्त शिक्षकांना का वेठीस धरले जाते, असे प्रश्न ठाणे जिल्हा परिषदेतील शहापूर, मुरबाड परिसरातील सेवा निवृत्त शिक्षक करत आहेत.
मार्च आर्थिक वर्षाअखेर असल्यामुळे मार्चचे सेवानिवृत्ती वेतन १५ एप्रिलपर्यंत होईल, असे सेवानिवृत्त शिक्षकांना वाटले होते. पण आता एप्रिल संपत आला तरी खात्यात सेवानिवृत्तीची रक्कम जमा झाली नसल्याने शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. अनेक शिक्षकांना गावी जायचे आहे. काही शिक्षकांचे घरांचे हप्ते, घरातील ज्येष्ठ, वृध्द यांच्या आजारपणाचा खर्च हा सेवा निवृत्ती वेतनातून मिळणाऱ्या रकमेतून भागविला जातो, असे अनेक शिक्षकांनी सांगितले. सेवा निवृत्तीची मार्चची रक्कम हातात नसल्याने पुढील कोणतेही नियोजन करता येत नसल्याचे शिक्षकांनी सांगितले.
अनेक सेवा निवृत्त शिक्षक, सेवा निवृत्त शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहापूर, मुरबाड, अंबरनाथ तालुका शिक्षण विभागाशी संपर्क साधला. पण ठोकळेबाज उत्तराशिवाय काही मिळत नसल्याने सेवानिवृत्त शिक्षक अस्वस्थ होते.
काही जाणत्या सेवानिवृत्त शिक्षकांनी दिलेली माहिती अशी, की शहापूर तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांसाठी दरमहा सुमारे एक कोटी ५६ लाखाची तरतुद असते. मुरबाडसाठी सुमारे एक कोटी ३० लाख, अंबरनाथ तालुक्यासाठी सुमारे ६५ लाखाची तरतुद असते. यावेळी शहापूर तालुक्यासाठी दीड कोटीचा सेवा निवृत्ती वेतनाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. सहा लाखाच्या निधीचा प्रश्न निर्माण झाला. मुरबाडचा निधी नजरचुकीने अंबरनाथला आणि अंबरनाथचा मुरबाडला वळता झाला. या रकमेतून जिल्हा परिषदेतून निवृत्त झालेल्या सर्व सेवानिवृत्त शिक्षकांना वेतन देणे शक्य नसल्याने तालुका शिक्षण विभाग बुचकळ्यात पडला होता.
अपुरी रक्कम वाटप केली तर अन्याय होणारे शिक्षक गप्प बसणार नाहीत. त्यामुळे जेव्हा एकाचवेळी पूर्ण निधी उपलब्ध होईल तेव्हाच निवृत्ती वेतनाचे वाटप करू असा विचार तालुका शिक्षण विभाग करत होता. याविषयी सेवानिवृत्त शिक्षकांनी लोकप्रतिनिधींकडे नाराजी व्यक्त केली. काहींना जि. प.च्या वरिष्ठांच्या कानावर हा विषय घातला. त्यानंतर वेगाने सुत्रे हालली. मंगळवारीच उपलब्ध निधीतून आहे त्या शिक्षकांचे निवृत्त वेतन करण्याच्या सूचना जिल्हा शिक्षण विभागाने तालुका शिक्षण विभागाला केल्या. त्याप्रमाणे मंगळवारी संध्याकाळपर्यंत सेवानिवृत्त शिक्षकांना वेतन मिळणे सुरू होईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
शहापूर तालुक्याला सहा लाखाचा शिक्षक सेवानिवृत्तीचा कमी निधी मिळाला आहे. परंतु, उपलब्ध निधीतून निवृत्ती वेतन वाटपाच्या सूचना केल्या आहेत. अलीकडे सेवा निवृत्त झालेल्या शिक्षकांचे वेतन आयोगाचे विषय, निवत्ती वेतन असे प्रश्न असल्याने त्यांना निधी उपलब्ध होताच सेवा निवृत्ती वेतन दिले जाईल. -बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी, ठाणे.