ठाणे : ठाणे जिल्ह्यात एकीकडे रस्ते अपघातांमध्ये नागरिक मृत्यूमुखी पडत असताना वाहतुक नियमांचे उल्लंघनाचे प्रमाणही अधिक असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. काही बेजबाबदार वाहन चालकांमुळे अपघात घडत आहे. वाहतुक पोलिसांकडून वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात ई-चलान यंत्राद्वारे कारवाई केली जाते. २०२४ या वर्षभरात ठाणे आयुक्तालय क्षेत्रात १०५ कोटी रुपयांहून अधिकची दंडात्मक कारवाई केली असून यातील फक्त ११ कोटी ७६ लाख रुपयांचा दंड वसूल करणे वाहतुक पोलिसांना शक्य झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यामध्ये दुचाकी चालविताना शिरस्त्राण (हेल्मेट) वापरण्यास टाळाटाळ, पादचाऱ्यांसाठी असलेले वाहन चालविताना सिग्नल लाल रंगाचा असतानाही तो ओलांडणे, विना परवाना वाहन चालविणे, विरुद्ध दिशेने वाहने चालविणे अशा प्रकारच्या नियमांचे उल्लंघन अधिक आहे. वाहतुक पोलीस देखील नियमभंग करणाऱ्या चालकांच्या वाहन क्रमांकाचा केवळ छायाचित्र काढून ई-चलान करावाई करतात. त्यामुळे थकित दंड भरण्याकडे वाहन चालक दुर्लक्ष करत होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मागील काही वर्षांत रस्ते अपघातात अनेकांचा बळी जात असल्याचे वास्तव समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. या अपघातानंतर ठाणे जिल्ह्यातील पादचाऱ्यांच्या आणि वाहन चालकांच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. काही बेदरकार वाहन चालकांमुळे आणि मानवी चुकांमुळे अपघात होत असले तरी वाहतुकीचे नियमभंग होण्याचे प्रमाण कायम आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी क्षेत्र येतो. ठाणे वाहतुक ठाणे आयुक्तालय क्षेत्रात २०१९ पासून ई-चलान यंत्रणाद्वारे कारवाई केली जात आहे. पोलिसांच्या कारवाईमध्ये पारदर्शकता यावी. यासाठी राज्यभरात ई- चलान यंत्रणाद्वारे कारवाई केली जाते. नियमांचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीला वाहनाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर संदेशाद्वारे माहिती दिली जाते. त्यानंतर तो व्यक्ती ऑनलाईन किंवा वाहतुक पोलिसांच्या कार्यालयात जाऊन दंडाची रक्कम भरू शकतो. तसेच एखाद्या प्रमाणात न्यायालयात हजर केल्यास न्यायालयाने ठरविलेल्या दंडाप्रमाणे कारवाई केली जाते.

मोटार वाहन कायद्याच्या कलमांनुसार वाहन चालकांविरोधात ई-चलान कारवाई केली जाते. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत १ लाख ५६ हजार ३३२ ई-चलाद्वारे कारवाई करण्यात आली. यामध्ये १०५ कोटी ६८ लाख १५ हजार २५० रुपयांचा दंड आकारण्यात आला. बेकायदेशिरपणे रस्त्यालगत वाहने उभी करणे, दुचाकी चालविताना शिरस्त्राण परिधान करण्यास टाळणे, मोटार चालविताना आसनपट्टा (सीटबेल्ट) वापरण्यास टाळणे, सिग्नल नियम ओलांडणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, मनाई रस्त्यांवर वाहने चालविणे अशा प्रकरणांचा सर्वाधिक सामावेश आहे.

वाहतुक पोलीस अनेकदा नियम उल्लंघन करणाऱ्यांचे छायाचित्र घेऊन त्यांच्यावर ई-चलान कारवाई करतात. त्यामुळे थकित दंड वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तर आम्हाला केवळ वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार आहेत. नागरिकांनी दंड भरल्यास तो दंड आम्ही घेतो. परंतु त्यांच्यावर तात्काळ दंड भरण्याची सक्ती करता येत नाही असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

ठाणे वाहतुक पोलिसांकडून वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ई-चलानद्वारे कारवाई केली जाते. ई-चलानचा थकित दंड ठेवणाऱ्या वाहन चालकांना नोटीसा पाठविल्या जातात. लोकअदालतमध्ये दंडाचा निपटारा केला जातो. नागरिकांनी त्यांचा दंड थकित असल्यास त्यांच्या भागातील वाहतुक पोलिसांच्या कार्यालयात जाऊन दंड भरल्यास त्यांच्या वाहनावर थकित दंड राहणार नाही. -पंकज शिरसाट, उपायुक्त, ठाणे वाहतुक शाखा.

सर्वाधिक नियमभंग

नियमभंगकारवाया
धोकादायकरित्या वाहन चालविणे१९७
बेदरकारपणे वाहन चालविणे७०५७
विना परवाना वाहन चालविणे ७८८२
वाहन परवाना सादर करण्यास टाळणे३१,३७५
सिग्नल ओलांडणे१,०४,९२४
दुचाकी चालविताना शिरस्त्राण परिधान करण्यास टाळणे१,८८,२८६
विरुद्ध दिशेने वाहन चालविणे २००१
मोटार चालविताना आसनपट्टा नसणे८२,४२९
वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे १८,८५१

मागील वर्षी ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ९३ कोटी ९२ लाख २ हजार २५० थकित दंड आहे. तर ११ कोटी ७६ लाख १३ हजार रुपयांचा दंड वाहन चालकांनी भरला आहे. त्यामुळे थकित दंडाची रक्कम आता दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is the police protecting reckless drivers mrj