गडकरी नाटय़गृहालगतच्या जागेचा प्रस्ताव अद्यापही कागदावर

ग्राहकांच्या तक्रारींचा वेगाने निपटारा व्हावा यासाठी ठाण्याच्या ग्राहक मंचाला गडकरी नाटय़गृहालगत देण्यात येणाऱ्या जागेचा प्रस्ताव अद्यापही कागदावरच असल्याची माहिती पुढे येत आहे.

ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ातील ग्राहकांच्या तक्रारींचे खटले ठाणे ग्राहक मंचाकडे दाखल होत असतात. मात्र, कामाच्या तुलनेत तक्रार निवारण मंचाकडे सद्य:स्थितीत उपलब्ध असलेली जागा खूपच कमी असल्याने नवी जागा मिळावी अशा स्वरूपाचा प्रस्ताव तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्याकडे सादर करण्यात आला होता.

जोशी यांनीही या प्रस्तावास हिरवा कंदील दाखवून गडकरी नाटय़गृहालगत एक जागा हस्तांतरित केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, ग्राहक मंचाकडे अद्यापही या जागेचे हस्तांतरण झाले नसून जिल्हा प्रशासनाने ज्या जागेच्या हस्तांतरणाची तयारी दाखवली आहे. त्याविषयी देखील ग्राहक मंचाच्या सदस्यांनी असमाधान व्यक्त केले आहे.

सद्य:स्थितीत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ग्राहक मंचाचा कारभार चालतो. अवघ्या दोन खोल्यांमध्ये ग्राहकांच्या तक्रारींचे खटले चालवले जातात. एका खोलीत एकामागोमाग एक असे दिवसाला ३०-४० खटले चालविले जातात. एका खटल्याची सुनावणी करताना अर्धा ते एक तास लागतो. या कार्यालयाचे कामकाज ४.३० वाजेपर्यंत चालते. मात्र नियोजित ३०-४० खटल्यांची सुनावणी एका दिवसात जागेअभावी पूर्ण होऊ शकत नाहीत.

याची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी अत्रे कट्टा येथे झालेल्या त्यांच्या मुलाखतीमध्ये ग्राहक मंचाला गडकरी रंगायतनजवळील एका शासकीय इमारतीत जागा देण्याचे निश्चित केले होते. याच काळात जोशी यांचीही बदली झाली. दरम्यानच्या काळात नव्या जागेसंबंधी कोणत्याही स्वरूपाचा पत्रव्यवहार झालेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. जोशी यांनी जी जागा यासाठी जाहीर केली आहे, तीदेखील अपुरी आहे.

नियोजित इमारतीतही दोन खोल्याच आहेत. त्यामुळे दस्ताऐवज कुठे ठेवावा, असा पूर्वीचाच प्रश्न उद्भविण्याची चिन्हे आहेत. शिवाय या इमारतीत उद्वाहक नसल्याने वयोवृद्ध तसेच अपंग आदी ग्राहकांना त्याचा त्रास होणार आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत जिल्हाधिकारी ग्राहक मंचाचे कामकाज सुरू आहे.

कर्मचाऱ्यांचीही कमतरता

ग्राहक मंचात तक्रार नोंदविल्यापासून जास्तीत जास्त तीन ते सहा महिन्यांत निकाल दिला जावा, असे गृहीत धरले जाते. यासंबंधी कायदा ग्राहक मंचाकडून करण्यात आला आहे. मात्र जागेच्या अभावामुळे ठाणे आणि पालघर जिल्हय़ातील ग्राहकांच्या तक्रारींची सुनावणी लांबणीवर पडत असल्याचे चित्र आहे. यासंबंधीच्या तक्रारी काही ग्राहक तसेच वकिलांच्या संघटनांनी जिल्हा प्रशासनाकडे केल्या आहेत. सद्य:स्थितीत ग्राहक मंचाकडे महिन्याला १५०-२०० खटले दाखल होतात. येथे कार्यरत असलेल्या पाच ते सहा कर्मचाऱ्यांची संख्याही आता कमी पडत आहे. या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Story img Loader