यंदाच्या थंडीत तरुणांची ‘जगदंब हुडी’ला पसंती
आपल्या ऐतिहासिक परंपरांविषयी मनामध्ये असलेला अभिमान अंगावरील कपडय़ांद्वारे मिरविणाऱ्या तरुणांची संख्या आता हळूहळू वाढू लागली आहे. त्यातूनच लोकप्रिय ऐतिहासिक व्यक्तिरेखांचा प्रभाव तरुणांच्या पोशाखावर दिसून येतो. गेली काही वर्षे टी शर्ट्स पुरता मर्यादित असलेला हा इतिहासाविषयीचा जाहीर अभिमान आता स्वेटर किंवा हुडीवरही अवतरला आहे. यंदाच्या हिवाळ्यामध्ये ‘जगदंब’ हे नाव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेल्या ‘जगदंब हुडी’ ठाण्यातील तरुण वापरताना दिसू लागले आहेत. ब्रॅण्डेड दुकानांपासून ते रस्त्यावरील पायरेटेड हुडीजमध्येही जगदंब हुडीज अधिक प्रमाणात दिसून येतात.
शिवाजी महाराज आणि त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेला पराक्रम याविषयी तरुणांच्या मनात अभिमान आहे. त्यातूनच तरुण मंडळी कपाळावर चंद्रकोर कोरतात, कानात भिकबाळी घालतात. त्याचप्रमाणे टी-शर्टवर विविध प्रकारचे श्लोक अथवा शिवचरित्रातील ओजस्वी वाक्ये छापून घेतात. इतिहासाविषयीचे हे प्रेम आणि अभिमान आता स्वेटर्स आणि हुडीमध्येही दिसून येते. शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले ‘जगदंब हुडीज’ही सर्वसामान्य हुडीजप्रमाणे ऊबदार असतात. यामध्ये केशरी रंगाचा वैशिष्टय़पूर्ण वापर करण्यात आला आहे. हुडीच्या टोपीला केशरी रंगाच्या मऊ फरचा वापर केलेला आहे. या हुडीमध्ये सर्वाधिक करडा रंग आढळून येतो. त्यावर दोन्ही बाजूंनी केशरी रंगाच्या बारिक पटय़ांचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर या हुडीजवर विविध श्लोकही लिहिलेले आढळतात. या हुडीचा सर्वाधिक वापर महाविद्यालयीन तरुण, मोटारसायकलस्वार, गिर्यारोहक करतात. त्यामुळे यंदा बाजारांमध्ये तिबेटच्या लोकांनी थाटलेल्या स्वेटर्स विक्रीच्या दुकानांमध्ये नेहमीच्या पारंपरिक हुडीपेक्षा ‘जगदंब हुडी’ना सर्वाधिक मागणी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा