डोंबिवली : वारंवार नोटीस पाठवुनही मालमत्ता कराची थकित रक्कम भरणा न केल्याने डोंबिवलीतील विकासक जगदीश वाघ यांच्या नावे असलेल्या डोंबिवली पूर्व रेल्वे काॅलनीमधील सद्गुरू इमारतीमधील दोन सदनिका सील करण्यात आल्या आहेत. तसेच, ठाकुर्ली खंबाळपाडा येथील कोळीवाडा हाॅटेल चालकाने मालमत्ता कराची रक्कम थकविल्याने त्यांचे हाॅटेल सील करण्यात आले, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी दिली.
डोंबिवली पूर्व पाथर्ली भागातील रेल्वे काॅलनीमध्ये सदगुरू इमारतीमध्ये विकासक जगदीश वाघ यांच्या नावे क्रमांक ४०१, ७०१ अशा दोन सदनिका आहेत. या सदनिकांचा मागील अनेक वर्षांचा मालमत्ता कर विकासकाने पालिककडे भरणा केलेला नाही. ही रक्कम २० लाख ९६ हजार ४३३ रूपये आहे. हा थकित रकमेचा कर भरणा करावा म्हणून विकासकाला यापूर्वी वारंवार नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. संंबंधितांकडून कर भरण्याविषयी प्रतिसाद न मिळाल्याने विकासक जगदीश वाघ यांच्या सदगुरू इमारतीमधील दोन्ही सदनिका सील करण्यात आल्या आहेत, अशी माहिती साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी दिली.
तसेच, ठाकुर्ली खंबाळपाडा भागातील कोळीवाडा हाॅटेलच्या मालकाने मालमत्ता कराची एक लाख ७३ हजार २७२ रूपयांची मालमत्ता कराची रक्कम थकविल्याने या हाॅटेल चालकाचे हाॅटेल सील करण्यात आले आहे. या मालकाला पालिकेने थकित कर भरणा करण्यासाठी वारंवार नोटिसा पाठविल्या होत्या. त्याची दखल न घेण्यात आल्याने हे हाॅटेल सील करण्यात आले, अशी माहिती मुंबरकर यांनी दिली.
या कारवाईत साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्यासह अधीक्षक महेश पाटील, वरिष्ठ लिपिक दौलत जांभेकर, शशिकांत म्हात्रे यांचे पथक सहभागी झाले होते. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, मालमत्ता कर उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी चालू आणि थकित मालमत्ता कर वसुलीचे आदेश दिले आहेत. या आदेशाप्रमाणे निवासी, वाणिज्य मालमत्ता धारकांनी थकित कर भरणा केला नसेल तर त्यांच्या मालमत्ता सील करण्यात येत आहेत. मालमत्ता सील करूनही थकबाकीदार मालमत्ता कर भरणा करत नसतील तर वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे संबंधित मालमत्तांचा लिलाव जाहीर करून येणाऱ्या रकमेतून थकित मालमत्ता कर वसूल केला जाणार आहे.
फ प्रभागात थकबाकीदारांकडील मालमत्ता कर वसुलीची मोहीम सुरू आहे. विकासक वाघ यांच्या नावे थकित मालमत्ता कर आहे. कोळीवाडा हाॅटेलकडे मालमत्ता कर थकित आहे. वारंवार नोटिसा देऊनही या दोन्ही थकबाकीदारांकडून कर भरणा केला जात नसल्याने त्यांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. हेमा मुंबरकर साहाय्यक आयुक्त,फ प्रभाग, डोंबिवली.