जय गणराज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, रामचंद्र नगर-१, ठाणे (प.)
ठाणे शहराच्या पश्चिमेला रामचंद्र नगर-१ येथे जय गणराज को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीची इमारत उभी आहे. १८ वर्षांपूर्वी या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. येथील रहिवाशांनी व्यवस्थापनाचे सर्व हक्क महिलांकडे देऊन समाजापुढे आदर्श ठेवला आहे.
गेल्या दोन दशकांत ठाणे शहराचा झपाटय़ाने विस्तार झाला. बैठय़ा इमारती, चाळींच्या जागी बहुमजली इमारती उभ्या राहिल्या. नव्या विभागांची निर्मिती झाली. बऱ्याच ठिकाणी पूर्वीच्या विभागांचा विस्तार झाला. मध्यवर्ती भागातील रामचंद्रनगर-१ त्यापैकीच एक. १९९९ मध्ये येथे जय गणराज को-ऑप. हौसिंग सोसायटी ही बहुमजली इमारत उभारण्यात आली. गेली १८ वर्षे हे संकुल गुण्यागोविंदाने नांदत आहे. एरवी सदनिकांमध्ये रूढ असणाऱ्या बंद दाराच्या संस्कृतीची लागण या वसाहतीला झालेली नाही. तिथे पूर्वीच्या चाळ संस्कृतीच्या लोभस खुणा दिसतात. संकुलात एकूण २८ कुटुंबे असून त्यांच्यात एकमेकांशी शेजारधर्माचे दृढ नाते आहे. बहुतेक सर्व कुटुंबे महाराष्ट्रीय आहेत. महिलांच्या हाती सोसायटीचा कारभार देऊन या इमारतीने इतरांपुढे एक चांगला आदर्श ठेवला आहे.
समितीच्या कार्यकारिणीत सर्व महिला आहेत. वैशाली भाटवडेकर या अध्यक्ष आहेत, तर विजया चौधरी सचिव आणि अर्चना दिवेकर या खजिनदार आहेत. मंजिरी पाटील, सुवर्णा शितूत, प्रीती भोरे, मानसी साळवे या सदस्य आहेत. संपूर्ण इमारत
म्हणजे एक मोठे घर मानून त्यानुसार निर्णय घेतले जातात. इमारतीच्या देखभालीकडे काटेकोरपणे लक्ष दिले जाते. नियमित स्वच्छता राखली जाते. त्यामुळे आता १८ वर्षे झाली तरी इमारत पूर्वीइतकीच सुंदर दिसते.
सुख-सुविधांचे संकुल
ठाण्याच्या अगदी मध्यवर्ती भागात हे संकुल आहे. इमारतीलगतच ठाणे महानगरपालिकेचे मुख्यालय आहे. तसेच जवळच टीएमटीचा बस थांबाही आहे. शेजारीच हॉटेल्स, मॉल आणि मोठी दुकाने आहेत.
काटेकोर सुरक्षाव्यवस्था
२४ तास सुरक्षा असलेल्या या संकुलात एकूण १६ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसेच प्रत्येक मजल्यावर प्रत्येकी एक-एक सीसीटीव्ही कॅमेरा आहे. यासोबत १२-१२ तास दोन सुरक्षा रक्षक येथे असतात.
हिरवा दिलासा
संकुलाच्या दुतर्फा सुमारे २५ ते ३० झाडे आहेत. त्यामुळे वातावरण अगदी प्रसन्न असते. झाडांचा पालापाचोळा पडतो, दररोज सकाळी सफाई कामगार येत असल्याने स्वच्छताही उत्तम असते. झाडे किती महत्त्वाची असतात, हे इथे आल्यावर जाणवते. विशेषत: सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात इथली गर्द सावली हवीहवीशी वाटते.
मोकळी जागा नसली तरीही..
इमारत जागेच्या मधोमध आहे. त्यामुळे चारही बाजूंना थोडी फारच मोकळी जागा आहे. मात्र या अपुऱ्या जागेचाही अतिशय कल्पकतेने वापर रहिवाशांनी केला आहे. कोणतीही जागा वाया जाऊ दिलेली नाही. इमारतीच्या भोवताली बसण्यासाठी बाकडेही बसविण्यात आलेले आहेत. छोटी का होईना वाहनतळासाठी इमारतीत जागा आहे.
उत्सवांची रेलचेल
सोसायटीत सर्वच सण उत्साहाने साजरे केले जातात. त्यात १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या भारताच्या राष्ट्रीय सणांचाही समावेश आहे. सकाळी सात वाजल्यापासून सोसायटीत कार्यक्रम असतात. लहान मुलांसाठी विविध स्पर्धा घेतल्या जातात.
देखभालीकडे विशेष लक्ष
समितीतील महिला सदस्य नियमितपणे बैठका घेतात. त्यामध्ये इमारतीची डागडुजी, उपक्रम अशा विषयांची चर्चा होते. एखादी गोष्ट ठरली की ती वेळेत पूर्ण केली जाते. योग्य देखभाल केल्यामुळेच इमारतीची प्रकृती अगदी ठणठणीत आहे.