लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी
वसई: भाईंदरमध्ये एका इमरातीच्या मराठी पर्यवेक्षकाला क्षुल्लक वादातून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रामदास वाकोडे (५९) हे भाईंदर येथील बालाजी बिल्डरकडे पर्यवेक्षकाचे काम करतात. येथील व्यकंटेश ज्योत या इमारतीच्या ९ व्या मजल्यावर अंकुश जैन आणि हिरालाल जैन यांनी सदनिका घेतली होती. त्यांच्या सदनिकेत पाण्याची समस्या होती. त्यामुळे शुक्रवारी वाकोड यांनी नळ दुरूस्त करणारा प्लंबर विजय प्रजापती यांना बोलावले होते. मात्र प्लंबर दुरूस्तीसाठी थेट जैन यांच्या सदनिकेत गेला होता. त्यावरून जैन यांनी वाकोडे यांना जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. या प्रकरणी वाकोडे यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून भाईंदर पोलिसांनी अंकुश जैन आणि हिरालाल जैन यांच्या विरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ३ (१) तसेच भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३२४, ५०४,५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आणखी वाचा-पोलिसांच्या तावडीत फरार झाल्यानंतर ३ ठिकाणी केली चोरी
मी गेली ३१ वर्षे पर्यवेक्षकाचे काम करत आहे. त्या इमातीत सर्व जैन आणि गुजराती कुटुंबीय राहतात. मी एकटाच मराठी व्यक्ती काम करतो. ३ ऑक्टोबर रोजी देखील आरोपींनी मला जातीवाचक शिविगाळ केली होती, असे फिर्यादी रामदास वाकोडे यांनी सांगितले. त्यावेळी मी दुर्लक्ष केले होते. मात्र शुक्रवारी त्यांनी मला पुन्हा जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली असे त्यांनी सांगितले.
आम्ही या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना यांच्यामार्फत करण्यात येत आहे अशी माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंपणे यांनी दिली.