पूर्वा भालेकर, लोकसत्ता
ठाणे – जिल्ह्यातील ग्रामीण भागात जल जीवन मिशन या योजनेचे काम वेगवान सुरु असून आतापर्यंत २ लाख ६१ हजार ०७६ घरांपैकी १ लाख ७९ हजार २२९ घरांमध्ये नळ जोडणी देण्यात आल्या आहेत. आता, जिल्ह्यात केवळ ८१ हजार ८४७ घरातील नळजोडणी बाकी आहेत. या नळ जोडणीही २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हा परिषदेचे ध्येय असून त्यानुसार हालचाली सुरु असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
गावातील महिलांचा पाणी आणण्याचा त्रास कमी व्हावा आणि ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी गावातील प्रत्येक घरात नळ जोडणी अवश्यक आहे. याकरिता, केंद्र सरकारमार्फत जल जीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे. २०२४ अखेरपर्यंत ग्रामीण भागातील सर्व घरात नळ जोडणी करण्याचे या योजनेचे मुळ उद्दिष्ट आहे. त्यानुसार, प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेमार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. ठाणे ग्रामीण भागातील महिलांना व पुरुषांना विहीर तसेच कुपनलिकेवर जाऊन पाणी आणावे लागत होते. परंतू, या योजनेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा त्रास कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
आणखी वाचा-ठाणे : नव्या वर्षात थकबाकीदारांवर कर सवलतींचा वर्षाव
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जल जीवन मिशन’ योजना आणखी वेगाने राबविण्यात येत आहे. त्यामुळे डिसेंबर २०२३ पर्यंत ग्रामीण भागात १ लाख ७९ हजार २२९ घरांमध्ये नळ जोडणी देण्यास जिल्हा परिषदेला यश आले आहे. अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि शहापूर या तालुक्यातील २ लाख ६१ हजार ०७६ घरांमध्ये नळ जोडणी देण्याचे जिल्हा परिषदेचे उद्दिष्ट होते. त्यापैकी आता, केवळ ८१ हजार ८४७ घरातील नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट शिल्लक राहिले आहे.
८१ हजार ८४७ घरातील नळजोडणी पैकी शहापूर, कल्याण आणि भिंवडी तालुक्यातील ३२ हजार घरांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची संपूर्ण प्रक्रिया झाल्याशिवाय या घरांमध्ये नळ जोडणी करता येणार नाहीये. ही प्रक्रिया देखील लवकरात लवकर पूर्ण करुन २०२४ अखेर पर्यंत या ३२ हजार घरांमध्येही नळ जोडण्या दिल्या जातील. तर, उर्वरित ४९ हजार ८४७ घरातील नळ जोडणी मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हा परिषदेचे ध्येय आहे.
आणखी वाचा-कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमधून वर्षभरात मोक्काचे १३० आरोपी अटकेत
आतापर्यंत तालुकानिहाय्य नळ जोडणी
तालुका | एकूण घरे | नळजोडणी दिलेली घरे |
अंबरनाथ | २१,७६२ | १६,१२३ |
भिवंडी | ९७,१७६ | ७७,३५९ |
कल्याण | २९,२१३ | २५,२२२ |
मुरबाड | ४०,७२५ | २०,६५७ |
शहापूर | ७२,२०० | ३९,८६८ |
एकूण | २,६१,०७६ | १,७९,२२९ |
जल जीवन मिशनमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा त्रास कमी होत आहे. २०२० पासून ही मोहीम राबविण्यात येत असून २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील सर्व घरांमध्ये नळ जोडण्या देण्याचे लक्ष आहे. त्यानुसार, जिल्हा परिषदेच्या या नळ जोडण्या मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय आहे. -प्रदीप कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, ठाणे