निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. अनेक गोष्टी शिकवत असतो. परंतु मनुष्य निसर्गाच्या दानाचा योग्य प्रकारे उपयोग तर करत नाहीच. दुष्काळाचेच उदाहरण घ्या ना, एकीकडे जमिनीतील पाण्याचा प्रचंड प्रमाणात उपसा करायचा तर दुसरीकडे पावसाचे पाणी साठविण्याची कोणतीही ठोस योजना राबवायची नाही. कोकणतील परिस्थितीत याहून काही वेगळी नाही. कोकण खऱ्या अर्थाने समृद्ध असतानाही पावसाच्या पाण्याचे नियोजन व योग्य प्रकारे साठवण न केल्यामुळे बारमाही शेती अथवा कृषी उत्पन्न घेणे शक्य असूनही ती घेता येत नाही. तसे पाहिले महाराष्ट्रातील बहुतेक म्हणजे तब्बल ८० टक्के शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. त्यामुळे पावसाच्या पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केल्यास महाराष्ट्र खऱ्या अर्थाने समृद्ध होऊ शकेल. राज्यात सरासरी पावसाचे प्रमाणे हे ५०० ते ४००० मिलिमीटर असून गावपातळीवर विविध प्रकारे पावसाचे पाणी योग्य प्रकारे साठवून ठेवले तर त्याचा वापर वर्षभर करता येणे शक्य आहे. ‘जलवर्धिनी प्रतिष्ठान’च्या उल्हास परांजपे यांनी यासाठी एक व्यावहारिक उपक्रम सुरू केला आहे. खरे तर ही लोकोपयोगी चळवळ आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन नोकरी-व्यवसाय केल्यानंतर निवृत्तीच्या कालखंडात कोकणातील एका गावात गेले असताना त्यांना पाणीसाक्षर मोहीमेची जाणीव झाली. आपल्याच एका ओळखीच्या व्यक्तीकडे कोकणात गेल्यावर पाण्याचे नियोजन का करत नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. उत्तरादाखल ‘तू मोठा इंजिनियर आहेस ना, मग तू कर ना नियोजन,’ असे बोल मित्राने ऐकवले. त्या दिवसापासून पाण्याची साठवण या विषयाचा उल्हास परांजपे यांनी अभ्यास सुरू केला. या वाटचालीत त्यांना सतीश पाटणकर, ऋचा परांजपे, उत्तरा परांजपे, ऋषिकेश दावल, डॉ. अविनाश परांजपे यांची मोलाची साथ लाभली. एक एकर शेतजमिनीवर साधारणपणे २० लाख लिटर पावसाचे पाणी पडते. एवढय़ा पाण्याची शेतीला गरज लागत नाही. त्यापैकी काही पाणी साठवता आले तर? त्या दृष्टीने उल्हास परांजपे यांनी अभ्यास सुरू केला. यातूनच मग एक एकर जमिनीपैकी दहा टक्केभागात साठवण टाकी उभारल्यास वर्षभर त्या पाण्याचा वापर करता येईल, हे त्यांच्या लक्षात आले. कोकणातील शेतकरी मुळातच गरीब. त्यामुळे त्याला परवडेल अशा किमतीत साठवण टाकी उभारण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले. स्वत:च्या संस्थेच्या माध्यमातून जनजागृती व आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यास सुरुवात केली. प्रामुख्याने रायगड व कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी साठवण टाक्या बांधून दिल्या. यात सुट्टय़ा दगडांचा बंधारा, वनराई बंधारा, बावखळ, कोकण जलकुंड जे जमिनीवर व जमिनीखाली बांधता येते. नारळाच्या काथ्या वापरून केलेले जलकुंड, अंबाडीचे धागे वापरून केलेले जलकुंभ, ज्यूटच्या धाग्यांचे जलकुंभ, फेरोसिमेंटची टाकी, शेततळी, घराच्या छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवण तसेच झाकणांचे विविध प्रकार तयार केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा