भीषण पाणीसंकटापुढे नागरिक-प्रशासन हतबल झाले असताना ठाणे जिल्ह्यातील काही गावांत मात्र जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून बांधण्यात आलेले वनराई बंधारे आधार ठरू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेला ग्रामपंचायती आणि नागरिकांनी प्रतिसाद देत गेल्या सहा महिन्यांत ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात सुमारे १ हजार ४१ वनराई बंधाऱ्यांची निर्मिती केली आहे. या बंधाऱ्यांमध्ये सुमारे ७२४ दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा करण्यात आला असून त्याचा फायदा सुमारे ३६० ग्रामपंचायतींमधील सुमारे १ हजार २०५ शेतकऱ्यांना मिळत आहे. या पाण्यावर भाजीपाल्याची मोठी लागवड सुरू आहे, असा दावा जिल्हा परिषदेने केला आहे.
ठाणे जिल्ह्य़ातील धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी घटू लागली आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागांत पाण्याचा ठणठणाट सुरू झाला आहे. कमी पडलेल्या पावसामुळे उन्हाळ्यात पाण्याची मोठी गैरसोय होणार हे लक्षात आल्याने काही ग्रामपंचायतींनी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून वनराई बंधाऱ्यांची बांधणी केली आहे. हे बंधारे आता या गावांसाठी आधार ठरू लागले आहेत. पावसाळ्यात नदी, नाले आणि ओढय़ांवर वनराई बंधारे बांधून त्या पाण्याचा उपयोग उन्हाळ्यात करता यावा यासाठी विकसित करण्यात आलेल्या पारंपरिक पद्धतीला या माध्यमातून गती देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्य़ात लोकसहभागातून पंधराशे वनराई बंधारे बांधण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. जिल्हाधिकारी आश्विनी जोशी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचे नियोजन करण्यात आले. वनराई बंधाऱ्यासाठी सुमारे १५ लाख सिमेंटच्या रिकाम्या गोण्या संपूर्ण जिल्ह्य़ातून जमा करण्यात आल्या. विविध उद्योजक, स्वयंसेवी संस्था, बांधकाम व्यावसायिक यांनी त्या उपलब्ध करून दिल्या. गांधी जयंतीच्या मुहूर्तावर या उपक्रमाला सुरुवात झाली आणि नदी, नाले, ओढय़ांमध्ये रिकाम्या गोण्यांमध्ये दगडमाती भरून पाणी अडविण्यात आले. कोणत्याही प्रशासकीय खर्चाशिवाय लोकसहभागातून राबवण्यात आलेल्या या योजनेतून सुमारे १ कोटीपेक्षा अधिक रकमेचे काम झाल्याचा दावा जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा