शहरातील फळ-भाजीच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची चिन्हे

ठाणे शहराच्या विविध भागातील किरकोळ विक्रेत्यांना फळ आणि भाजीचा पुरवठा करणाऱ्या जांभळी नाका भाजी मंडईच्या परिसरात बेकायदा फेरिवाले बसू लागले असून यामुळे मंडईतील व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाकडे तक्रारी देऊनही फेरिवाल्यांवर कारवाई होत नसल्यामुळे व्यापाऱ्यांनी १५ एप्रिलपासून भाजी मंडई बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शहरातील फळ-भाजीच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे येथील जांभळीनाका भागात मोठी फळ आणि भाजी मंडई आहे. याठिकाणी २५० हून अधिक फळ-भाजी विक्रेते गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसाय करीत आहे. याठिकाणी व्यापाऱ्यांच्या दोन संघटना कार्यरत आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी मैदान भाजी विक्रेता सेवा संघ आणि जिजामात फळ‌-भाजी विक्रेता सेवा संघ या संघटनांचा समावेश आहे. या भाजी मंडईच्या परिसरातील रस्त्यावर बेकायदा फेरिवाले फळ-भाजी विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. करोना काळापासून हे फेरिवाले बसत आहेत. या फेरीवाल्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. पहाटे साडे तीन वाजेपासून ते सकाळी १० वाजेपर्यंत हे फेरिवाले व्यवसाय करतात. यामुळे भाजी मंडईतील ग्राहक कमी झाले आहेत. व्यवसायावर परिणाम झाल्याने व्यापाऱ्यांपुढे आर्थिक संकटात सापडले आहेत.

हेही वाचा >>>ठाणे: ईराणी टोळीतील सोनसाखळी चोर अटकेत, आठ गुन्हे उघडकीस

बेकायदा फेरिवाल्यांमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. पहाटे ४ ते ९ यावेळेत भरत असलेल्या अवैध बाजारामुळे बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांवरील टिएमटी बस तसेच इतर वाहनांची वाहतूक बंद करून ही वाहतूक तलावपाळी मार्गे सोडण्यात येते. त्यामुळे तलावपाली ते स्थानक मार्गावर वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास होतो. या फेरिवाल्यांविरोधात पालिका आणि पोलिस प्रशासनाकडे तक्रार देऊनही कोणतीच कारवाई होत नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. फेरीवाले शिल्लक भाजी आणि खराब झालेली भाजीचा कचरा त्याचठिकाणी टाकून निघून जातात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. या फेरिवाल्यांविरोधात पालिका आणि पोलिस प्रशासनाकडे तक्रार देऊनही कोणतीच कारवाई होत नसल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ १५ एप्रिलपासून फळ-भाजी मंडई बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. छत्रपती शिवाजी मैदान भाजी विक्रेता सेवा संघ आणि जिजामात फळ‌-भाजी विक्रेता सेवा संघाची सर्वसाधारण सभेत नुकतीच पार पडली असून त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.

जांभळी नाका भाजी मंडईतील परिसरातील रस्त्यांवर बेकायदा फेरिवाले बसत आहेत. या फेरिवाल्यांमुळे भाजी मंडईच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. पालिका आणि पोलिसांकडे तक्रार करुनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे १५ एप्रिलपासून फळ-भाजी मंडई बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. -अंकूश ठोंगे ,अध्यक्ष, छत्रपती शिवाजी मैदान भाजी विक्रेता सेवा संघ

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jambli naka vegetable market is closed from tomorrow due to hawkers amy
Show comments