या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जांभळांची आवक ८० टक्क्यांनी कमी; वाढते नागरीकरण आणि लहरी निसर्गाचा फटका

एरवी दरवर्षी उन्हाळय़ात काळय़ाचुटूक जांभळांनी भरलेल्या टोपल्यांनी गजबजून जाणाऱ्या बदलापूर शहरात यंदा जांभळे औषधालाही दिसेनाशी झाली आहेत. बदलापूरजवळच्या ग्रामीण भागातून दर वर्षी होणारी जांभळांची आवक यंदा घटली आहे. गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागात वाढलेले नागरीकरण आणि नैसर्गिक बदलांमुळे जांभळांची आवक ८० टक्क्यांनी घटल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

अंबरनाथ तालुक्यात करवंद, जांभळे असा रानमेवा मोठय़ा प्रमाणावर पिकतो. बदलापूरचा जांभूळ बाजार जांभळांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध मानला जातो. येथे गरवी आणि हळवी अशा दोन जातींची जांभळे बदलापुराच्या बाजारात येतात. मुंबई, ठाण्यातील फळांचे व्यापारीही बदलापूरच्या जांभळांच्या घाऊक खरेदीसाठी येत असत. पण गेल्या काही वर्षांत जांभळांच्या बाजारात मंदी आली आहे. ‘नागरीकरण आणि ऐन जांभळांच्या मोसमात निसर्गात होणाऱ्या बदलांमुळे जांभळांची आवक घटली आहे, असे येथील व्यापारी कल्लू खान यांनी सांगितले. गेल्या तीन पिढय़ा जांभळांच्या व्यापारात असलेल्या कल्लू खान यांच्याकडे बदलापूरच्या आसपासच्या ग्रामीण भागातून अनेक आदिवासी बांधव जांभळे विकण्यासाठी येत असतात. बदलापूर पश्चिमेतील महालक्ष्मी तलावाजवळ मोकळ्या जागेत खान यांच्याकडे ग्रामीण भागातून अनेक जांभूळवाले जांभूळ पाटय़ा घेऊन येत असतात. मात्र गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा जवळपास ८० टक्के जांभळांची आवक कमी झाल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी झाडांच्या कत्तली झाल्या आहेत. अवकाळी पावसामुळेही जांभळांचा बहर कमी झाला आहे. त्याचा थेट परिणाम जांभळांच्या उपलब्धतेवर झाला आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

जांभळांचा प्रदेश

उल्हास नदीचे खोरे, श्री मलंग डोंगर रागा या प्रदेशात जांभळांची बरीच झाडे होती. येथील समाजजीवनातही त्याच्या खुणा आढळतात. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या दरम्यान जांभूळ नावाचे एक गावच आहे. अंबरनाथ शहराच्या पूर्वेला वेशीवर असणाऱ्या गावाचे नाव जांभिवली आहे. जांभिवली आणि काकोळे गावादरम्यान असलेल्या जलस्रोतावर ब्रिटिशांनी धरण बांधले. जीआयपी टँक म्हणून त्याची रेल्वेच्या दप्तरी नोंद असली तरी स्थानिक स्तरावर हा प्रदेश जांभूळ तळे म्हणूनच ओळखला जातो.

बांधकामांमुळे अनेक झाडे तोडली गेली आहेत. आमची जांभळांची झाडे अद्याप शाबूत आहेत. मात्र वातावरणातील बदलामुळे आमची पहिली जांभळांची पाटी निघायला मे महिन्याचा मध्य उजाडला. त्यामुळे यंदाचे उत्पादनही कमीच राहणार असल्याचे दिसते.

–  बाबू कोंडिलकर, जांभूळ उत्पादक

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jamun fruit import decreases
Show comments