रस्त्यांवर सोडून दिलेल्या तान्ह्य़ा मुलांचा सांभाळ करून त्यांना दत्तक योजनेद्वारे पालक मिळवून देण्याचे काम डोंबिवली येथील ‘जननी आशीष’ ही संस्था गेल्या दोन दशकांहून अधिक काळ करीत आहे. सामाजिक भान असणाऱ्या डोंबिवलीकर महिलांनी स्थापन केलेल्या या संस्थेद्वारे आतापर्यंत ४३६ मुलांना आई-वडील मिळवून दिले आहेत..
पहाटेची वेळ होती. बाहेर बऱ्यापैकी काळोख होता. इकडे तिकडे पाहत तिने संस्थेच्या दारामधून प्रवेश केला. काय करावे याचा निर्णय होत नव्हता. तिने आपल्या बाळाला एकदा छातीशी कवटाळले. डोळ्यामधून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. अखेर मन घट्ट करत दरवाजाबाहेरच्या पाळण्यात तिने आपल्या बाळाला अलगद ठेवले आणि आल्या पावली ती निघून गेली.. ते बाळ आता त्या संस्थेचे झाले.. आईच्या मायेने.. यशोदेच्या कन्हय्याप्रमाणे त्याचे लालनपालन सुरू आहे. अशी अनेक हतभागी, रस्त्यावर सोडून दिलेल्या लहानग्यांचा ती आधार आहे.
अनाथांची माऊली बनणे हे श्रीकृष्णाने करंगळीवर डोंगर पेलण्यासारखे आहे. हे आव्हान पेलणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही. त्यासाठी आईचे हृदय असणे गरजेचे आहे. दुधावरची साय बनून मायेची सावली बनण्याची वृत्ती असणे आवश्यक आहे. कुमारी मातांनी त्याग केलेल्या तसेच रस्त्यावर सोडून दिलेल्या लहान मुलांचा सांभाळ करणे हे शिवधनुष्य पेलण्यापेक्षा अवघड काम आहे. डोंबिवलीमधील २१ महिलांनी गेली अडीच दशके हे आव्हान नुसतेच पेलले नाही तर या लहानग्यांना आई-वडीलही मिळवून दिले आहेत.
देवकीने श्रीकृष्णाला जन्म दिला खरा परंतु त्यांचे लालनपालन गोकुळात यशोदा मातेने केले. यशोदेने ज्या प्रेमाने आपल्या कन्हय्याचे संगोपन केले, त्याच प्रेमाने डोंबिवली पूर्व येथील ‘जननी आशीष चॅरिटेबल ट्रस्ट’च्या गोकुळात गेल्या अडीच दशकांच्या काळात कित्येक बालकांचा सांभाळ होत आहे. डॉ. कीर्तीदा प्रधान यांच्या मनात प्रथम ही अनाथांची माऊली बनण्याची कल्पना आली. जयश्री देशपांडे, स्नेहल कर्णिक बिना धुत, जयश्री मोकाशी आणि सुलभा धोंडे यांनी ही कल्पना उचलून धरली. पाठोपाठ आणखीही डोंबिवलीतील महिला पुढे आल्या. या महिलांनी स्वत:च्या खिशातून पाच हजार रुपये काढले. त्यातून डोंबिवलीच्या एमआयडीसी येथे जिखमान्यासमोर पंधराशे चौरस फुटांची जागा १९८९ च्या सुमारास घेतली. वर्षभरातच कामाची सुरुवात तत्कालीन अर्थमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत सुरूही झाली आणि १९९३ मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश पी. एन. भगवती यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटनही झाले. तेव्हापासून ही संस्था लहानग्यांचा आधारवड बननू उभी आहे. गेल्या अडीच दशकांच्या वाटचालीत अनेकांनी या संस्थेला साथ दिली. मदतीचा हात दिला. त्यांच्या कामाची दखल घेतली. पाठही थोपटली. परंतु आईच्या मायेने संस्थेचे कामकाज चालविणाऱ्या या ‘यशोदां’ खऱ्या अर्थाने रमल्या त्या आपल्या ‘जननी आशीष’च्या गोकुळातच..
सुरुवातीला थोडीच मुले होती. तान्ह्य़ा बाळापासून सहा वर्षांपर्यंतच्या मुलांचा सांभाळ या गोकुळात केला जातो. कारण आपला कायदा. त्या पुढच्या मुलांच्या जबाबदारीसाठी वेगळी व्यवस्था करावी लागते. शासनाचे नियम धृतराष्ट्रासारखे आंधळे आहेत. त्याचा फटका अशा प्रकारे लहान मुलांचा सांभाळ करणाऱ्या अनेक संस्थांना बसतो. महाराष्ट्रात अजघडीला सहा वर्षांपर्यंत रस्त्यावर सोडून दिलेल्या तसेच कुमारी मातांच्या मुलांचा सांभाळ करणाऱ्या ६३ संस्था आहेत. आई-वडिलांअभावी पोरक्या असलेल्या या अनाथ मुलांना दत्तक देण्याचे कामही जननी आशीष संस्था करते. आई-वडिलांची माया मिळवून देण्यासाठी शासनाने केलेल्या कायद्यांची अडथळ्याची शर्यत पार करणे, ज्यांना दत्तक मुल हवे आहे, अशांसाठीही कमालीचे त्रासदायक आहे. एकीकडे शासन स्वत: फार काही करणार नाही आणि दुसरीकडे स्वयंस्फूर्तीने सामाजिक बांधीलकी मानून काम करणाऱ्या संस्थांपुढे अडथळ्यांचे डोंगर उभे करून ठेवणार. या साऱ्यामधून वाटचाल करण्याचे काम डोंबिवलीतील जननी आशीष करत आहे. सहा वर्षांपर्यंतच्या या मुलांच्या आरोग्यापासून सर्वागीण विकासापर्यंत सर्वप्रकारची काळजी संस्था प्रेमाने घेत असल्याचे संस्थेच्या कार्यकारी संचालिका जयश्री देशपांडे यांनी सांगितले. आम्ही मुलांच्या संगोपनासाठी १२ केअर टेकर नियुक्त केल्या आहेत. त्याचप्रमाणे शिक्षक, बालरोगतज्ज्ञ आणि डॉक्टरांकडून या मुलांच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जाते. एखादा मुलगा जास्त आजारी पडल्यास त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले जाते. तसेच आवश्यकतेनुसार केईएम वा सायन रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार केले जातत. मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी, पुस्तके, त्यांना गोष्टी तसेच त्यांच्यातील अंगभूत कौशल्याचा विकास व्हावा यासाठी काही समाजसेवकही नियमितपणे संस्थेत येऊन मुलांना शिकविण्याचे काम करतात, असेही जयश्रीताईंनी सांगितले. संस्थेने आजपर्यंत ४३६ मुलांना आई-वडील मिळवून दिले. दत्तक पालक मिळवून देताना कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी संस्थेकडे मानद वकिलही आहेत. दत्तक गेलेल्या मुलांची योग्य प्रकारे काळजी घेतली जाते अथवा नाही, यावरही संस्थेचे लक्ष असते. सध्या संस्थेमध्ये ३६ मुले असून यामध्ये अंध, अपंग व मतिमंद अशा दहा मुलांचा समावेश आहे. या मुलांसाठी पालक शोधणे हे एक आव्हान असते. दहा वर्षांच्या अंध मुलाला तबला-पेटी वाजवायला शिकविण्यात येत असून गरजेनुसार त्यांना बाहेरही स्वतंत्रपणे शिक्षणाची व्यवस्था केली जाते. तान्ह्य़ा बाळांच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. या मुलांच्या संगोपनासाठी कोणतीही कमतरता राहू नये यासाठी आयांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या अनाथ मुलांना मायेची सावली सतत मिळावी यासाठी संस्थेच्या सर्व विश्वस्त बारीक लक्ष ठेवून असतात. डॉ. कीर्तीदा यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘जननी आशीष’ खरोखरच अनाथांची माऊली बनून उभी आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून किती लोक असा विचार करतात, याची कल्पना नाही. तथापि अशा प्रकारचे काम करणाऱ्या संस्थांना जमेल तशी मदत करून समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सर्वानीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. अनाथ, अपंग, मतिमंद, गतिमंद यांच्यासाठी काम करणे ही एक वेगळीच इश्वरीय सेवा आहे. यासाठी यशोदेचे हृदय असले पाहिजे. शासनच्या अडेलतट्टू नियमांचा ‘कंस’ आणि तिथे संवेदनाहीनतेने काम करणारे ‘बाबू लोक’ अशा सामाजिक कामांमध्ये अडथळे उभे करतात ते दूर करण्याची मोठी गरज आहे. तरच या मुलांच्या पालनपोषणासाठी समाजातून मोठय़ा प्रमाणात मदतीचे हात पुढे येऊ शकतील.
जननी आशीष- पी-३७, डोंबिवली जिमखान्यासमोर, एमआयडीसी विभाग, डोंबिवली (पूर्व)०२५१/२४५५८७९. ९३२३३८९५१६. ७७१०९९८७३७.