लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: नागरिकांच्या तक्रारी प्रभाग स्तरावर मार्गी लावण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने दर सोमवारी जनता दरबार घेण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी तीन ते पाच वाजताच्या कालावधीत जनता दरबार होईल.

परिमंडळ एक आणि दोन उपायुक्त यांच्या अधिपत्याखाली मध्यवर्ति प्रभाग कार्यालयात हा जनता दरबार होईल. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील विविध प्रकारच्या तक्रारी थेट आयुक्तांकडे दाखल होतात. या तक्रारींचा दैनंदिन निपटारा करणे शक्य होत नाही. या तक्रारी मार्गी लावण्यासाठी नागरिक पालिका मुख्यालयात कल्याण येथे फेऱ्या मारतात.

आणखी वाचा-उलट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करा; यार्डातील आंदोलनानंतर मनसे आक्रमक

नागरिकांचे नागरी समस्यांसंदर्भातचे प्रश्न ते राहत असलेल्या प्रभाग स्तरावर मार्गी लागले पाहिजेत यासाठी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी जनता दरबार घेण्याचे आदेश दिले आहेत. विविध भागात राहत असलेल्या नागरिकांना कल्याण येथे येण्याचा त्रास यामुळे वाचणार आहे. कल्याण मध्ये पालिका मुख्यालयात परिमंडळ एक उपायुक्त धैर्यशील जाधव, डोंबिवलीत पालिका विभागीय कार्यालयात स्वाती देशपांडे यांच्या अधिपत्याखाली जनता दरबार होणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जनता दरबारात नागरी समस्यांबरोबर कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबींची दखल घेतली जाणार आहे. जनता दरबाराला साहाय्यक आयुक्त, तांत्रिक अधिकारी, कर्मचारी यांना उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. विभागीय उपायुक्तांकडे नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्या १५ दिवसात मार्गी लावण्याचे आदेश आयुक्त दांगडे यांनी दिले आहेत. पालिका, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणार आहे.