ठाणे : नवी मुंबईतील भाजपचे नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्यासंबंधी केलेल्या केल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत (शिंदे गट) शीतयुद्ध सुरू झाले आहे. या दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेत्यांमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरु असतानाच, गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचा मुहुर्त अखेर ठरला आहे. येत्या सोमवारी म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील खारआळी भागातील रघुवंशी हाॅलमध्ये हा जनता दरबार होणार आहे. बालेकिल्ल्यात होणाऱ्या या जनता दरबाराचे बॅनर शहरभर झळकू लागल्याने शिवसेनेत (शिंदे गट) अस्वस्थता पसरली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाणे शहर हे ओळखले जाते. शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी तेच ठाणेदार असल्याचे दाखवून दिले होते. याच बालेकिल्ल्यात जनता दरबार घेण्याची घोषणा मंत्री गणेश नाईक यांनी काही दिवसांपुर्वी कोपरीतील कार्यक्रमादरम्यान केली होती. त्यावर शिवसेना (शिंदे गट) नेत्यांनी प्रतिक्रियाही व्यक्त केल्या होत्या. त्यानंतरही नाईक यांनी आणखी एक विधान केले होते. ठाणे हे आपले सर्वांचेच असल्याचे सांगत या शहरातील अडीअडचणी सोडविण्यासाठी गरज पडली तर, अधिकाऱ्यांची बैठक घेऊ, असे विधान नाईक यांनी ठाण्यातील माघी गणेशोत्सव दर्शनादरम्यान केले होते. या विधानाचीही बरीच चर्चा झाली होती. नाईक यांच्या विधानानंतर भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट)असा सामना रंगला होता. असे असतानाच, नवी मुंबई येथील ऐरोलीमध्ये मेळाव्यात काँग्रेसचे नेते व माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. या कार्यक्रमादरम्यान मी कधीही दरबारी राजकारण केले नाही असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते. या निमित्ताने शिंदे यांनी नाईक यांना टोला लगावल्याची चर्चा शहरात रंगली आहे. एकूणच दोन्ही नेत्यांमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरु असल्याचे चित्र आहे. असे असतानाच, गणेश नाईक यांनी ठाण्यातील जनता दरबाराची तारिख अखेर जाहीर केली असून त्याचे बॅनर आता शहरभर झळकताना दिसून येत आहे.

वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेल्या घोषणेनंतर त्यांचा जनता दरबार शहरात केव्हा होणार याविषयी चर्चा रंगल्या होत्या. नाईक यांनी जनता दरबाराची तारीख जाहीर केल्याने आता या चर्चांना पुर्णविराम मिळाला असून येत्या सोमवारी म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील खारआळी भागातील रघुवंशी हाॅलमध्ये हा जनता दरबार होणार आहे. त्याचे बॅनर शहरातील चौका-चौकात लावण्यात आले आहेत. शिवसेनेचा (शिंदे गट) बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात मंत्री नाईक यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आल्याने शिवसेनेत (शिंदे गट) अस्वस्थता पसरली आहे.

Story img Loader