ठाणे : जपान सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नोमूरा रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी लिमिटेडच्या कार्यालयास भेट देऊन अधिकाऱ्यांकडून प्रकल्पांची माहिती घेतली. या भेटीदरम्यान, स्मार्ट सिटीमार्फत राबविण्यात येणारे प्रकल्प, वापरण्यात येणारे तंत्रज्ञान तसेच भविष्यात होणारे प्रकल्प, यात जपानमधील कंपन्या तांत्रिक बाबींवर कशाप्रकारे मदत करू शकतात, यावर चर्चा झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
जपानी संस्थेच्या वतीने मुख्य प्रकल्प रचनाकार अया होंडा आणि भारतातील प्रतिनिधी वर्षा गुप्ता यांनी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त व स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांची शुक्रवारी भेट घेऊन शहरातील स्मार्ट सिटी प्रकल्पांबाबत चर्चा केली. यावेळी कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड, ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडचे क्षेत्राधारीत विकास प्रकल्प व पॅन सिटी प्रकल्पांचे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार उपस्थित होते. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे स्मार्ट सिटी विभाग आणि जपान सरकार यांच्यात २०२२ मध्ये सहकार्याचा करार करण्यात आलेला आहे. यानुसार देशातील स्मार्ट सिटी शहरांमध्ये शाश्वत शहरी विकासात सहकार्य करण्यासाठी विविध उप गट बनविण्यात आलेले आहेत. याच आधारावर दोन्ही देशांमधील सहकार्य वाढविण्यासाठी जपान इंडिया स्मार्ट सिटी कोऑपरेटीव्ह प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने, वर्षभरात दोनदा जपान सरकारचे प्रतिनिधी तसेच संस्थेचे प्रतिनिधी यांच्यासोबत ठाणे महापालिकेचा ऑनलाईन पध्दतीने संवाद झाला होता. तसेच नोव्हेंबर २०२४ मध्ये जपान सरकारच्या पायाभूत सुविधा आणि पर्यटन विभागाच्या प्रतिनिधींनी ठाणे स्मार्ट सिटी लि च्या कार्यालयास भेट देऊन प्रकल्पांबाबत माहिती घेतली होती. याच उपक्रमातील आणखी एक बैठक शुक्रवारी पार पडली.
या बैठकीत केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड मार्फत ठाणे शहरात विविध प्रकल्प राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची माहिती जपान सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नोमूरा रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेच्या प्रतिनिधींनी घेतली. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत एकूण ३५ प्रकल्प हाती घेण्यात आले होते. त्यापैकी ३२ प्रकल्प पूर्ण झालेले आहेत. तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून प्रतिनिधींना देण्यात आली. विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणी मध्ये येणारी आव्हाने आणि त्यांचा सामना करण्यासाठी जपानी कंपन्यांकडे असलेले तांत्रिक सहाय्य याबाबत प्राथमिक चर्चा झाली. स्मार्ट सिटी मार्फत राबविण्यात येणारे प्रकल्प वापरण्यात येणारे तंत्रज्ञान तसेच भविष्यात होणारे प्रकल्प, यात जपानमधील कंपन्या तांत्रिक बाबींवर कशाप्रकारे मदत करू शकतात यावर प्रामुख्याने चर्चा झाली, अशी माहिती संदीप माळवी यांनी दिली.