Jaydeep Apate Arrest : काही दिवसांपूर्वी मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कारवाई करत मालवण पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटील यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला होता. मात्र, तेव्हापासून जयदीप आपटे हा फरार होता. दरम्यान, आता जयदीप आपटेला पकडण्यात पोलिसांना यश आलं असून त्याला अटक करण्यात आली आहे. ठाणे ग्रामीण आणि बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा त्याला कल्याणमधून ताब्यात घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर जयदीप आपटे फरार झाला होता. ही घटना घडताच मालवणला जातो सांगून तो घरातून निघून गेला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या शोधात होते. त्यासाठी मालवण पोलीस, कल्याण, ठाणे ग्रामीण पोलिसांची एकूण पाच पथके कल्याण, भिवंडी, शहापूर परिसरात त्याचा शोध घेत होती.

हेही वाचा – Sharad Kelkar : “छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळणं वेदनादायी”, अभिनेता शरद केळकरची हळहळ; म्हणाला,” या गोष्टीचं राजकारण…”

जयदीप आपटेला कल्याणमधून घेतलं ताब्यात

जयदीप आपटे याची सासुरवाडी शहापूर येथे असल्याने तो याच भागात लपून बसला असावा, असा पोलिसांना संशय होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पोलीस शहापूर परिसरातील हॉटेल्स, लॉज, शेतघरे तपासून तेथे आपटेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. याशिवाय मालवण पोलिसांनी त्याच्या पत्नी आणि आईचा जबाबही नोंदविला होता. पण त्यांच्याकडूनही पोलिसांना आपटेची माहिती मिळत नव्हती. अखेर आता पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं असून त्याला कल्याणमधून ताब्यात घेतलं आहे.

बांधकाम सल्लागार चेतन पाटीललाही अटक

दरम्यान, याप्रकरणी २९ ऑगस्ट रोजी कोल्हापूर पोलिसांनी बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील याला ताब्यात घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व मालवण पोलीस यांच्या ताब्यात दिले होते. त्यावेळी मालवण पोलिसांनी पाटील याला अटक केली होती. यानंतर ३१ ऑगस्ट रोजी चेतन पाटील याला मालवण न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

हेही वाचा – Amol Kolhe: “पुतळ्यानं स्वतःहूनच मान टाकली…”, पंतप्रधान मोदींच्या माफीनाम्यानंतर डॉ. अमोल कोल्हेंची कवितेमधून प्रतिक्रिया

तत्पूर्वी चेतन पाटीलने माध्यमांना प्रतिक्रिया देताना या पुतळ्याशी माझा काहीही संबंध नसून मी फक्त चुबतऱ्याचं डिझाईन दिलं होतं, असा दावा त्यांनी केला होत. “मी सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे चबुतऱ्याचं डिझाईन दिलं होतं. मला चुबतऱ्यावर ११ टन वजन असेल, असं सांगण्यात आले होतं. त्यानुसार मी त्याचं डिझाईन बनवलं होतं. माझा मुख्य पुतळ्याशी संबंध नाही. त्या पुतळ्याचं काम ठाण्यातल्या एका कंपनीला दिलं होतं”, असं त्याने सांगितले होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaydeep apate arrested from kalyan in malvan shivaji maharaj statue collapse incident spb