बदलापूरः अंबरनाथ तालुक्यातील वांगणीजवळ काराव ग्रामपंचायतीत गेल्या दोन वर्षांपासून बिनदिक्कतपणे सुरू असून यात १२ फुटांपेक्षा खोल खड्डे खोदून त्यात पाणी जिरवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक काराव ग्रामपंचायतीने स्वतः महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाला दिलेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे ग्रामपंचायत हे पाणी नदी नाल्यात सोडले जात नसून कोणत्या तरी अडगळीच्या जागी शेतात सोडतात असा खुलासाही त्या अहवालात करत आहे. या कारखान्याबाबत विधानसभेच्या २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकीत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतरही या कारखान्यावर कारवाई झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रशासन कारखान्याप्रती किती संवेदनशील आहे हे उघड झाले आहे.

उल्हासनगरच्या वालधुनी नदीच्या गटारगंगा होण्याच्या प्रक्रियात जीन्स धुलाई कारखान्यांचे मोठे योगदान होते. पुढे प्रक्रिया केंद्र उभारा किंवा कारखाने बंद करा असे आदेश निघाले आणि येथील कारखाने विविध भागात स्थलांतरीत झाले. बहुतांश कारखान्यांनी अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात आपला मोर्चा वळवला. ग्रामीण भागात नदी किनारी सर्वात आधी हे कारखाने सुरू झाले. तेथे कारवाई झाल्यानंतर ग्रामीण भागात ग्रामपंचायतींच्या वेशीवर हे कारखाने आज बिनदिक्कतपणे सुरू आहेत.

बदलापूर शहरापासून काही किलोमीटर अंतरावर वांगणीजवळ काराव ग्रामपंचायत आहे. या गावात ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागच्या बाजुला जीन्स धुलाई कारखाना विनापरवानगी सुरू असल्याची बाब लोकसत्ताने उघडकीस आणली होती. हा कारखाना गेल्या दोन वर्षांपासून २०२२ पासून सुरू असल्याची बाब स्थानिक ग्रामपंचायतीच्या अहवालातून समोर आली आहे. तर गुगलच्या छायाचित्रांनुसार २०१९ पासून हा कारखाना अस्तित्वात असल्याचे दिसते आहे. २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार कालिदास कोळंबकर आणि योगेश सागर यांनी याबाबत तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना जीन्स धुलाई कारखाना ग्रामपंचायत हद्दीत सुरू असल्याची कबुली ग्रामपंचायतीने दिली होती. मात्र त्यानंतरही त्यावर कारवाई झालेली नाही.

धक्कादायक म्हणजे ग्रामपंचायत कारावने ९ जानेवारी २०२४ मध्ये महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाला दिलेल्या अहवालात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. काराव येथील गट क्रमांक ११ यात ९६ गुंठ्यांवर तीन पत्र्याचे गाळे असून त्यातील एकात कामगार राहतात तर दुसऱ्यात जीन्स धुलाईचे काम केले जाते असे नमूद केले आहे. तर तिसऱ्या गाळ्यात सुकवणे आणि पॅकींगचे काम केले जाते. याच जागेत ३० फुट बाय ४० फुट आणि १२ फुट खोल असे दोन खड्डे खोदण्यात आले असून त्यात दुषीत पाणी साठवले जाते असेही अहवालात नमूद केले होते. हे पाणी बाहेर जात नाही असा दावा ग्रामपंचायतीने केला होता. ही बाब ग्रामपंचायतीसाठी प्रदुषणकारी वाटली नाही.

त्याउपर ग्रामपंचायतीने या जीन्स धुलाई कारखान्याला पाठिशी घालण्यासाठी आणखी काही धक्कादायक बाबी आक्षेपार्ह नसल्यासारखी नमूद केली आहे. कारखान्याच्या जागेतील खड्ड्यामध्ये साचलेले पाणी कारखानदार स्वतः टँकरने अ़डगळ जागी आपल्या शेतात सोडतात. त्यामुळे कोणतेही दूषित वातावरण किंवा रसायनाचा वास परिसरात येत नाही, असाही दावा या अहवालात केला होता.

कोणताही सांडपाणी प्रकल्प नसताना, प्रक्रिया केलेले सांडपाणी उघडपणे जमिनीत मुरवले जात असताना काराव ग्रामपंचायत प्रशासनाला यात काहीही नियमबाह्य किंवा बेकायदा न वाटल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या कारखान्याला संरक्षण देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून होतो आहे.