बदलापूरः उल्हास नदीत येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे नदीचे पाणी गढूळ झाले आहे. त्याचा परिणाम बदलापुरात असलेल्या उल्हास नदीवरील पाणी शुद्धीकरण केंद्राच्या प्रक्रियेवर होत असून गाळामुळे येथील यंत्रणा वारंवार ठप्प होते आहे. तसेच नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचाही रंग बदलला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र जीवन प्राधिकरणाने पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. जून महिना संपत आला तरी ठाणे जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नसल्याने पाणीसंकट डोक्यावर आहे. मात्र आसपासच्या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होतो आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमधून वाहणारी उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाण्याच्या पातळीसोबतच नदीतील पाणीही मोठ्या प्रमाणावर गढूळ झाले आहे.
बदलापूर शहरात उल्हास नदीवर बॅरेज बंधारा आहे. येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे पाणी शुद्धीकरण केंद्र चालवले जाते. येथून उचललेले पाणी संपूर्ण बदलापूर शहर आणि अंबरनाथ शहराच्या काही भागात पुरवले जाते. या दोन्ही शहराची पाणी पुरवठ्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आहे. अंबरनाथमध्ये जीवन प्राधिकरणाच्या पाण्यासोबतच एमआयडीसी आणि चिखलोली धरणातूनही पाणी पुरवठा होत असतो. बदलापुरच्या या बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रातून गेल्या काही दिवसांपासून बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पुरवले जाणार पाणी गढूळ असल्याचे समोर आले आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून गढूळ पाण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारीवर स्पष्टीकरण देताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एक आवाहन जारी केले आहे. पावसामुळे उल्हास नदीच्या पाण्यात माती आणि गाळाचे प्रमाण वाढले आहे.
या गढूळतेमुळे पाण्याचा रंग बदलला असल्याचे यात जीवन प्राधिकरणाने नमूद केले आहे. नदीचे पाणी निवळेपर्यंत अशाच प्रकारे पाणी गढूळ येत राहील असेही जीवन प्राधिकरणातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीनचे प्रमाणही वाढवण्यात आल्याचे प्राधिकरणाने सांगितले आहे. या प्रक्रियेमुळे पाण्याला येणारा वास वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन जीवन प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे.