ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील सराफाच्या दुकानातून पावणे सहा कोटी रुपयांहून अधिक रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. कोट्यवधी रुपयांचे दागिने चोरल्यानंतर त्यांनी थेट ठाणे रेल्वे स्थानक गाठले. त्यामुळे हे चोरटे परराज्यात निघून गेले की इतर कुठे यादिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. चोरी करण्यासाठी हे चोरटे रेल्वे मार्गानेच आले असावे असा अंदाज पोलिसांचा आहे. पोलिसांकडून आता रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले जात आहे.
ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडे अवघ्या काही मीटर अंतरावर सराफाचे दुकान आहे. हे दुकान खूप वर्षांपासून याठिकाणी आहे. मंगळवारी मध्यरात्री १.३० ते पहाटे ४.३० या कालावधीत या सराफाच्या दुकानातून पाच कोटी ७९ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. ६ किलो ६०० ग्रॅम वजनाचे हे दागिने आहेत. मालकाने दिलेल्या तक्रारीनंतर याप्रकरणात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नौपाडा आणि ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेची पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत. या सराफाच्या दुकानात दोन चोरटे शिरत असल्याचे दुकानाबाहेरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आढळून आले आहे. त्यांनी दुकान मांडून ठेवलेले सोन्याचे हार, सोनसाखळ्यांसह इतर ऐवज चोरी केला.
हेही वाचा…मुंब्रा शहरात फेरीवाल्यांमध्ये राडा, जागेच्या वादातून फेरीवाल्याच्या पायावरून दुचाकी चालविली
ठाणे रेल्वे स्थानकातून हे चोरटे आले असून चोरी केल्यानंतर ते पुन्हा ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघून गेल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. त्यामुळे हे चोरटे परराज्यात निघून गेले की इतर कुठे याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांकडून आता स्थानक परिसरातील चित्रीकरणाची पाहणी केली जात आहे. सराफा दुकानाबाहेर सुरक्षा रक्षाकाची नियुक्ती देखील करण्यात आली नव्हती असेही पोलिसांनी सांगितले.