ठाणे : सर्जनशीलता, कल्पकतेबरोबरच जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मानखुर्दमधील पूजा दळवीने कागदांपासून हस्तकला व्यवसायात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पुजाने टाकाऊ लग्नपत्रिकांद्वारे विविध प्रकारचे आकर्षक दागिने बनवून इतर महिलांना व्यवसायाचा नवा मार्ग दाखवला आहे.
महाराष्ट्र शासनाचे महिला व बाल विकास विभाग यांच्यावतीने महिला आर्थिक विकास महामंडळच्या ५०व्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नव तेजस्विनी महोत्सव २०२५ या भव्य प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. राज्यातील विविध भागांमध्ये अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या पारंपारिक हस्तकला आहेत. यामध्ये कातणे, विणणे, शिवणकाम, कोरीवकाम, नक्षीकाम आदींचा समावेश आहे. मात्र मानखुर्द येथे राहणाऱ्या पूजा दळवीने जिद्द आणि सातत्याच्या जोरावर आपल्याकडे असलेल्या हस्तकलेचे व्यवसायात रुपांतर करत स्वत:ची एक नवी ओळख निर्माण केली आहे. टाकाऊ लग्नपत्रिकांचा वापर करीत त्यापासून निरनिरळ्या प्रकारचे दागिने केले आहेत. यातून तिने स्वयंरोजगाराचा मार्ग शोधला आहे. वाशी येथील प्रदर्शनात पूजा दळवी हिने स्टॉल मांडला आहे.
पूजाला शालेय जीवनापासून शुभेच्या पत्र बनवण्याची आवड होती. मात्र तिला तिच्या मोठ्या बहिणीमुळे कागदापासून वेगवेगळ्या प्रकारचे दागिने तयार करायची आवड निर्माण झाली. पुजाने २०१९ मध्ये तिच्या बहिणी सोबत व्यवसाय सुरु केला आहे. सध्या पूजा आणि तिची बहिण टाकाऊ लग्नपत्रिकेच्या कागदापासून गळ्यात घालण्यासाठी विविध प्रकारातील अलंकार आणि कानातील दागिने तयार करतात. या दागिन्यांची ५० ते ५०० रुपयांपर्यंत विक्री केली जाते. विविध सणांसाठी त्या वेगवेगळ्या प्रकारचे दागिने तयार करतात. सध्या गुढीपाडव्यासाठी देवी आणि राजमुद्रा असे मध्यलंकार असलेले दागिने तयार केले आहेत. त्याचबरोबर चाफा झुमका, महालक्ष्मी कानातले, कमळाचे झुमके, कंदील झुमके असे विविध दागिने त्या टाकाऊ लग्नपत्रिकेच्या कागदापासून तयार करतात. दागिन्यांच्या विक्रीसाठी वेगवेगळ्या प्रदर्शनात स्टॉल्स लावले जातात. तसेच विक्रीसाठी समाजमाध्यमांचा वापर करत इतर महिलांसमोरही नवा आदर्श प्रस्तापित केला आहे. दागिने बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल हा मालाड वरून आणला जातो. तर, जुन्या झालेल्या लग्न पत्रिका या ग्राहक स्वत: आणुन देतात. काही कालावधीनंतर त्यांनी प्रदर्शने आयोजित केली. या प्रदर्शनात येणाऱ्या लोकांना हलकी, नैसर्गिक, युनिक आणि पाणी-प्रतिरोधक कागदी दागिने खूपच आवडली. ग्राहकांचा प्रतिसाद वाढू लागल्याने त्यांनी या व्यवसायाला दीर्घा हॅंडिक्राफ्ट असे नाव दिले आहे. त्याचप्रमाणे या व्यवसायातून महिन्याला तिला ३० ते ५० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याचे पूजाने सांगितले.
गावातील सण -उत्सवात विक्री
पूजाची मोठी बहीण ही शाळेमध्ये शिक्षिका आहे. शाळेत मुलांना शिकवत असताना मुलांकडून ती क्विलिंग आर्ट शिकली. त्यातून पुजालाही आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी लग्नपत्रिकांवर छोटे नमुने बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला कागदाचे मणी तयार करून साधे दागिने बनवण्याचा प्रयत्न केला. त्यात यशस्वी ठरल्यानंतर दोघी बहिणीनी मिळून गावातील सण-उत्सवांत दागिन्यांची विक्री सुरू केली. यात त्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी हा व्यवसाय पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.
प्रदर्शनात सांगली येथे राहणाऱ्या संगीता कोळी यांनी कोकमचा स्टॉल मांडला आहे. त्यांनी कोकमपासून ‘स्वीट कोकम’ हा अनोखा पदार्थ तयार केला आहे. या व्यवसायातून वर्षाला ४ ते ५ लाखाचे उत्पन्न मिळते. कोळी यांच्याकडून नकळत कोकम साखरेच्या पाकात राहिला होता. या अनपेक्षित प्रसंगातून एक नवा पदार्थ त्यांनी साकारला आणि तो महाबळेश्वरसारख्या प्रसिद्ध ठिकाणी लोकप्रिय झाला असल्याचे त्यांनी सांगितले.