लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, ‘एससीईआरटी’ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. मनुस्मृतीचा सामावेश या आराखड्यात असल्याने राज्य सरकारविरोधात टीकेची झोड उठविली जात आहे. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी ते महाड येथे जाऊन मनुस्मृतीचे दहन करणार आहेत.
ज्या मनुस्मृतीने स्त्रियांचे अधिकार नाकारले, ज्या मनुस्मृतीमुळे आपले पूर्वज पाच हजार वर्ष त्रासात जगले, तीच मनुस्मृती पुन्हा एकदा हे सरकार आणत आहे, याचा तीव्र विरोध व्हायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी या मनुस्मृतीचे दहन केले, त्याच ठिकाणी पुन्हा एकदा आपण जाऊन याचे दहन करणार आहोत आणि सरकारचा निषेध करणार आहोत त्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
आणखी वाचा-चोरी दडवण्यासाठी कल्याणमध्ये अंधेरीतील तरुणीने रचला ॲसिड फेकल्याचा बनाव
सत्ताधारी मागच्या दाराने त्यांच्या मनातील गोष्ट पूर्ण करु पाहत आहेत. आमचे संविधान म्हणजेच मनुस्मृती, असे म्हणणारे जेव्हा सत्तेत येतात तेव्हा काय घडते, त्याचे उदाहरण म्हणजे पाठ्यपुस्तकांचा यादीत पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश होत आहे. ज्या मनुस्मृतीने देशाचे वाटोळे केले, समाजात दुही माजवली आहे, समाजामध्ये चातुवर्ण्याचा समावेश केला, जातीभेद निर्माण केला, स्त्रियांना तर सर्वात वाईट वागणूक घेण्याची पद्धती या मनुस्मृतीने जन्माला घातली, ती मनुस्मृती परत आणली जात आहे असेही आव्हाड म्हणाले.
जे लोक १९५० मध्ये म्हणाले की, आम्हाला तुमचे संविधान मान्य नाही, आमचे संविधान म्हणजे मनुस्मृती. तेच लोक आता मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला आणि आम्हाला संविधान वाचवायचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ मध्ये मनुस्मृती दहन केली आणि १९५० मध्ये संविधान जन्माला घातले. त्यासाठी आपण महाडला जात आहोत असे आव्हाड यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा-डोंबिवलीत कंपनी स्फोटाने नुकसान झालेल्या ९४१ मालमत्तांचे पंचनामे
सुरबानानांचे नातू करणार मनुस्मृतीचे दहन
२५ डिसेंबर १९२७ रोजी मंचावर सहस्रबुद्धे, चित्रे आणि चिटणीस उपस्थित होते. त्यांच्या समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मनुस्मृतीमधील प्रत्येक अध्याय वाचून दाखवत होते. मनुस्मृतीमधील हे अध्याय मंजूर आहेत का, असेही विचारत होते. त्यावेळेस लोकांकडून उत्स्फूर्तपणे नाही असेच उत्तर येत होते. त्यानंतर त्यांनी मनुस्मृती जाळण्याचा निर्णय जाहीर केला. मनुस्मृती जाळत असताना त्यांनी सहस्रबुद्धेंना विचारले, तुम्हाला मनुस्मृती जाळणे मान्य आहे का? त्यावर सहस्रबुद्धे म्हणाले, ब्राह्मण म्हणून नाहीच. पण, माणूस म्हणून तर नाहीच नाही! या सर्वांच्या मागे जी शक्ती उभी होती ती म्हणजे तत्कालीन नगराध्यक्ष सुरबानाना चिटणीस. त्यांचे नातू मिलींद चिटणीस यांच्या हस्ते एक ऐतिहासिक संदर्भ म्हणून बुधवारी मनुस्मृती जाळण्यात येणार आहे, असेही डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.