ठाणे : आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप करत याप्रकरणी रिदा रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचे पडसाद उमटत असतानाच आव्हाड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय समाजमाध्यमावर जाहीर केला. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आव्हाड यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन राजीनामा देऊ नये अशी समजूत काढली. तसेच दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आव्हाड यांच्यावर दाखल झालेला गुन्हा चुकीचा असून त्यांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा असल्याचे स्पष्ट केले. तसेच या प्रकरणात षडय़ंत्र असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला.
अशाप्रकारे षडय़ंत्र रचून फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एक वेगळय़ा प्रकारचे वातावरण तयार होत असेल तर त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देणे आवश्यक आहे, असे अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून अवघ्या काही फूट अंतरावर हा प्रकार घडला आहे. त्यांनीच समोर येऊन असे काही झाले नाही असे सांगितले पाहिजे, असेही ते म्हणाले. मुंब्य्रात झालेल्या छठ पुजेच्या कार्यक्रमावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आणि तक्रारदार महिला हे दोघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित होते आणि त्यावेळी आव्हाड यांनी भाषणादरम्यान त्या महिलेचा बहीण असा उल्लेख केल्याचे सांगत ती चित्रफीत पत्रकार परिषदेत सादर केली. या चित्रफितीतून कोणत्याही स्त्रीबद्दल जितेंद्र आव्हाड कशी भावना व्यक्त करतात, हे दिसून येईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. त्याच भगिनी काल अत्यंत गर्दीत मुख्यमंत्र्यांच्या गाडीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होत्या. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी स्थानिक खासदाराला गर्दीतून मुख्यमंत्र्यांच्या गाडीकडे जाण्यास मदत केली. त्यानंतर आव्हाड पुढे वळताच या महिला पुढे आल्या. यावेळी ‘एवढय़ा गर्दीत कशाला येताय, बाजूला जा’ असे भाष्य करून आव्हाड पुढे निघून गेले. यामध्ये कोणतीही आक्षेपार्ह कृती नव्हती. ही घटना ३५४ कलमाच्या व्याखेत बसत नसतानाही त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. सत्ता येते आणि जाते, काळही बदलत असतो, त्यामुळे पोलिसांनी हे देखील लक्षात ठेवावे, परंतु, पोलीससुध्दा अशा पध्दतीने वागत असतील तर मात्र लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
आव्हाड भावूक
विनयभंगाचा गुन्हा मान्य नाही. जो मी आयुष्यात कधी केला नाही. पोलिसांनी हा गुन्हा कसा काय नोंद केला. त्या महिलेने तक्रारीमध्ये वापरलेले शब्द चित्रफितीत स्पष्ट ऐकू येत आहेत. समाजात माझी मान खाली जाईन, अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करायचा हा षडय़ंत्राचाच भाग असू शकतो. राजकारणात आक्रमकपणा नवीन नाही. खालच्या पातळीवरील राजकारण महाराष्ट्रात होऊ नये. घरे उद्ध्वस्त होतील, असे सांगत आमदार जितेंद्र आव्हाड भावूक झाले.
नेमका प्रकार काय झाला?
रिदा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वाय जंक्शन येथे रविवारी रात्री एमएमआरडीएने बांधलेल्या एका पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले गेले. या लोकार्पण कार्यक्रमास आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाडीत बसून जात असताना रिदा त्यांना भेटण्यासाठी जात होत्या. त्याचवेळी आव्हाड हे समोरून येत होते. त्यांनी विनयभंग करण्याच्या उद्देशाने बाजूला हो, असे म्हणत ढकलले. असे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर त्या परिमंडळ एकचे उपायुक्तांना भेटल्या आणि मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आव्हाड यांना एका प्रेक्षकास मारहाण केल्याप्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर हा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी मुंब्रा बाह्यवळण, मुंबई नाशिक महामार्गावर वाहनांचे टायर जाळून रास्तारोको केला. आव्हाड़ यांनी वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यानंतर न्यायालयाने मुंब्रा पोलिसांना त्यांचे म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
रिदा रशीद या कोण आहेत?
ठाणे : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगचा आरोप करत मुंब्रा पोलीस ठाण्यात तशी तक्रार दाखल करणाऱ्या रिदा रशीद या भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा आहेत. त्या मुंब्रा परिसरात राहत असून यापूर्वी त्या मुंबईतील अंधेरी येथील लोखंडवाला भागात राहत होत्या. त्यांचे पती अजगर रशीद यांची खासगी कंपनी असून त्याचे कार्यालय मुंबईत आहे. रिदा रशीद या मुंब्रा परिसरात सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून काम करीत आहेत. त्या गेल्या काही वर्षांपासून भाजपचे काम करीत आहेत. त्या २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस कळवा-मुंब्रा मतदारसंघातून भाजपकडून निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक होत्या. परंतु या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती झाली आणि ही जागा शिवसेनेच्या वाटय़ाला गेली. या मतदारसंघात शिवसेनेने दीपाली सय्यद यांना उमेदवारी दिली होती. पण, त्यांचा निवडणुकीत पराभव झाला.
‘पोलीस आणि राज्य महिला आयोगाने कारवाई करावी’
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी ठाण्यातील एका उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या वेळी आपल्याशी केलेल्या गैरवर्तनाबाबत पोलीस आणि राज्य महिला आयोगाने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस रिदा रशीद यांनी सोमवारी केली. महिलांच्या सन्मानाची भाषा करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या आपल्या पक्षाच्या आमदाराच्या कृत्याबाबत गप्प का आहेत, त्यांचा महिलांच्या सन्मानाविषयीचा कळवळा आता कुठे गेला, असा सवाल रशीद यांनी भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
रशीद यांनी आव्हाड यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्याविषयी माहिती देताना रशीद म्हणाल्या, ठाण्यात रविवारी झालेल्या उड्डाणपुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आमंत्रण असल्यामुळे मी तेथे गेले होते. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मी बाजूला थांबले होते. मुख्यमंत्री वाहनातून निघाले असताना मी त्यांना भेटण्यासाठी जात होते. तेव्हा समोरून येणाऱ्या आव्हाड यांनी मला सरळ बाजूला करीत पुरुषांच्या गर्दीत ढकलून दिले. ‘तू इथे काय करीत आहेस,’ अशी विचारणाही त्यांनी मला केली. या घटनेची ध्वनिचित्रफीत सर्वत्र प्रसारित झाली असून त्यात आव्हाड यांनी मला कोणत्या पद्धतीने ढकलले, हे स्पष्टपणे दिसते आहे.
आम्ही सुडापोटी कारवाई करीत नाही -मुख्यमंत्री
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी पोलीस नियमानुसार चौकशी करतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी येथे केले. संबंधित महिलेच्या तक्रारीत तथ्य असेल, तर पोलीस आपले काम करतील. आम्ही कोणावरही सुडापोटी कारवाई करीत नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे की नाही, याबाबत मला माहीत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
तक्रारदार महिलेवर अॅट्रोसिटीचा गुन्हा
ठाणे : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेवर मुंब्रा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (अॅट्रोसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा येथील मुंब्रेश्वर मंदिरात छटपूजा कार्यक्रमापूर्वी मंदिरात जातीवाचक शिवीगाळ करून मंदिर परिसरातून बाहेर हाकलले. तसेच रविवारच्या लोकार्पण कार्यक्रमातही जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारदार तरुणाने केला आहे.
शिवा जगताप (२९) असे त्यांचे नाव असून ते कल्याण येथे बांधकाम व्यावसायिक आहेत. २६ ऑक्टोबरला ते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत छटपूजा कार्यक्रमासाठी मुंब्रेश्वर मंदिर परिसरातील तलावाची पाहाणी करण्यास गेले होते. त्यावेळेस तिथे आव्हाड यांच्याविरोधात तक्रार करणारी महिला आणि तिच्या काही सहकारी त्या ठिकाणी होत्या. त्या महिलेने त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. असे शिवा यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्याचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर मानसिक खच्चीकरण झाल्याचेही शिवाने तक्रारीत म्हटले आहे. रविवारी वाय जंक्शन येथील लोकार्पण कार्यक्रमातही शेजारी उभ्या राहून जातीवाचक शिवीगाळ केल्याचे त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणी शिवा यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तत्कालीन नगरविकासमंत्र्यांचीही चौकशी करणार का?; म्हस्के यांच्या विधानावर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया
ठाणे : गेल्या अडीच वर्षांतील माजी मंत्र्यांच्या सर्वच विभागांची चौकशी केली जाणार असल्यासंदर्भात बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केलेल्या विधानावर आता राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभाग होता. मग, त्यांच्या विभागाचीही चौकशी करण्यात येणार आहे का, असा प्रतिप्रश्न परांजपे यांनी विचारला आहे. आघाडीतील माजी मंत्र्यांच्या सर्व खात्यांच्या चौकशी केली जाणार असून त्याबाबतचा निर्णय लवकरच येणार आहे. तेव्हा कोणाला जामीन मिळतोय का बघा असा सूचक इशारा बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिला होता. त्यास परांजपे यांनी प्रतिउत्तर देत आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.