ठाण्यात पाणी तुंबल्याच्या मुद्द्यावरून टोला
ठाणे : पहिल्याच पावसात ठाणे शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याची चित्रफित समाजमाध्यामांवर प्रसारित करत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांसह पालिका आयुक्तांवर टिका केली आहे. “शासन आपल्या दारी, आता ठाणेकरांची बारी…घेऊन आले पावसाचे पाणी, मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी..!” असा उपरोधिक टिका त्यांनी लगावला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात शनिवारपासून पाऊस सुरू झाला आहे. गेल्या चोवीस तासात शहरात २०० मी मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे बुधवारी शहरात २० ठिकाणी पाणी तुंबल्याचे प्रकार समोर आले. यामध्ये नौपाडा, पाचपखाडी, खारकर आळी, कोपरी, वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा आणि घोडबंदर भागाचा समावेश आहे. या भागांमध्ये तुंबलेल्या पाण्याची चित्रफित समाजमाध्यामांवर प्रसारित करत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांसह पालिका आयुक्तांवर टिका केली आहे. पहिल्या दोन दिवसाच्या पावसातच ठाण्यात पाणी तुंबले आहे. असा प्रकार ठाण्यात कधीच होत नव्हता. विशेष म्हणजे नाले सफाईची पाहणी स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली होती, असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा >>> बेकायदा इमारती, चाळींमुळे कल्याण-डोंबिवली तुंबली
‘ठाण्यात पाणी तुंबणार, त्याकडे लक्ष द्या’,अशी विनंती मी अनेक वेळा ठाणे पालिका आयुक्त यांच्याकडे केली होती. परंतु मुख्यमंत्र्यांच्या ‘विशेष सेवेत’ दंग असणाऱ्या आयुक्तांना याकडे लक्ष देण्यास बहुदा वेळ मिळाला नसावा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. ‘पाऊस आला याच कौतुक करा..ठाणे तुंबल याची तक्रार काय करता..!’ अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देतील अशी मला खात्री आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. ‘शासन आपल्या दारी, आता ठाणेकरांची बारी.. घेऊन आले पावसाचे पाणी, मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी..!’, अशी टिकाही त्यांनी लगावला आहे.