ठाणे : उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना पक्ष दावणीला बांधयचा होता आणि त्यांना पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करायचा होता, त्यांचे सत्तेत सामील होण्याचे आधीच ठरले होते. त्यात शरद पवार यांचा त्यांना अडसर होता. त्यामुळेच त्यांना शरद पवार यांना बाजुला करायचे होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. बापाची चप्पल पायात आली म्हणून माणूस बाप होत नाही. फक्त पाय वाढलेला असतो, अक्कल वाढत नसते, अशी टीका करत शरद पवार यांच्याबद्दल बोलायला अजित पवार इतके मोठे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर सडकून टीका केली. बापाची चप्पल पायात आली म्हणून माणूस बाप होत नाही. फक्त पाय वाढलेला असतो, अक्कल वाढत नसते. तुम्ही हे जर सांगत असाल की, शरद पवारांच्या खूप गोष्टी आम्हाला माहिती आहेत, त्या आम्ही हळूहळू काढणार, तर खुशाल काढा आणि अशा आव्हानात्मक भाषा वापरू नका. शरद पवारांनी अनेक आव्हान बघितली आहेत, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. एवढे दिवस आम्ही बोलत नव्हतो, पण तुम्ही शरद पवारांवरच बोलायला लागलात तर आम्हाला सगळेच सत्य सांगावे लागेल, असे प्रत्युत्तरही त्यांनी दिले.
हेही वाचा – अस्वच्छ ठिकाणी जमिनीवर लाटून तयार केल्या जात आहेत पुर्या, भाईंदरमधील कारखान्यावर छापा
वंशाचा दिवा, मुले आणि मुली इथपर्यंत तुम्ही खाली घसरला आहात. तुम्ही पवार नसता तर बारामतीतून तुम्ही निवडून आला असता का, मी त्यांच्या घराण्याचा नाही, हा माझा दोष आहे का, असे तुम्ही म्हणता. तुमची पुण्याई आहे म्हणून तुम्ही शरद पवार यांच्या घरात जन्माला आला आहात. आव्हाडांच्या घरात जन्माला आला असता तर तुम्ही ४ वेळा उपमुख्यमंत्रीपद मिळाले नसते. बंडखोरीनंतरही तुम्हाला पुन्हा पक्षात घेतले नसते, असेही ते म्हणाले. शरद पवार यांनी १९९९ साली राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. केरळ, ओडीसा, गुजरात, आसाम, अरुणाचल या राज्यात शरद पवार यांच्यामुळेच आमदार निवडून आले. त्यांच्यामुळेच पक्षाला राष्ट्रीय नेतृत्व मिळाले. तुम्हालाही सभेत त्यांचा फोटो वापरावा लागला, असेही आव्हाड म्हणाले.
बीड जिल्ह्यात खुनांची मालिका
आमच्यावर अजित पवार गटाचे काही नेते टीका करत आहेत, जे स्वत:च्या काकाच्या पाठीत खंजीर खुपसून आले आहेत. सख्या चुलत बहिणीचे हालहाल केले, भाजपचे जिल्हाध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी कुणामुळे आत्महत्या केली. आताच बीडमध्ये एकाची हत्या झाली. याप्रकरणी एक साधी केस घेतली नाही, असे गंभीर आरोप आव्हाड यांनी केले आहेत. बीड जिल्ह्यात २०२२ पासून जी खूनांची मालिका सुरु झाली, त्यामागे कोण आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आम्हालाही बोलता येते. तुम्हालाच बोलता येते असे नाही. मी कुणाचे ऐकायला जन्माला आलेलो नाहीय. मी कुणाच्या नादाला लागत नाही. आपल्या नादाला कुणी लागू नये, असा इशारा आव्हाड यांनी दिला.