ठाणे : ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाणी प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. शुक्रवारी आव्हाड यांनी वकिलांमार्फत अटकपूर्व जमीनासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अंतरिम जामीन मिळताच आव्हाड यांनी गंभीर आरोप केले. माझ्यासारख्या नेत्यावर गुन्ह्यातील कलमे दाखल करताना, मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय कलमे दाखल करण्याची कोणत्याही पोलीस आयुक्ताची हिमंत नाही असे आव्हाड म्हणाले. या प्रकरणात कलम ३०७, शस्त्रास्त्र कायदा कलमांतर्गत गुन्हे कसे दाखल करण्यात आले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महेश आहेर यांच्याकडे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र आहे. त्यानंतरही त्यांना बढती कशी मिळाली असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण झाल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तर आव्हाड हे याप्रकरणातील पाहिजे आरोपी आहेत. शुक्रवारी दुपारी आव्हाड यांनी अटकेपासून संरक्षण मिळविण्यासाठी वकिलांमार्फत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांना ठाणे न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला असून या प्रकरणात पोलिसांना म्हणणेही सादर करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. दरम्यान, अंतरिम जामीन मिळताच आव्हाड यांनी आहेर यांच्यावर गंभीर आरोप केले. माझ्यावर वांरवार गुन्हे दाखल होत आहेत. हे कोणाच्या सांगण्यावरून होत आहे. या प्रकरणात कलम ३०७, शस्त्रास्त्र कायदा कलमांतर्गत गुन्हे कसे दाखल करण्यात आले.
माझ्यासारख्या नेत्यावर गुन्ह्यातील कलमे दाखल करताना, मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय कलमे दाखल करण्याची कोणत्याही पोलीस आयुक्ताची हिमंत नाही असे आव्हाड म्हणाले. कार्यकर्ते हेमंत वाणी, विक्रम खामकर यांच्या कुटुंबियांना धमक्या येऊ लागल्या आहेत. याचा तपास करणे आवश्यक असल्याचे आव्हाड म्हणाले. अन्यायाचा अतिरेक करू नका, समाजमाध्यमांमुळे नागरिकांपर्यंत सर्व माहिती जात असते. जेवढा अन्याय जास्त कराल तितक्या जास्त ताकदीने आम्ही लढू असेही ते म्हणाले. ध्वनिफित सादर केल्यानंतर न्यायवैद्यक अहवालात तो आहेर यांचा आवाज नाहीच असाच अहवाल येणार असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी आव्हाड यांची मुलगी नताशा यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला सुरक्षा पुरविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतरही कोणतीही सुरक्षा मिळाली नसल्याचे त्या म्हणाल्या. तसेच आहेर यांच्याविरोधात तक्रार देऊनही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नसल्याचे त्या म्हणाल्या.