ठाणे : ‘हर हर महादेव’ चित्रपटास केलेल्या विरोधामुळे अटकेची कारवाई झालेले राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांना जामिनावर सुटका होताच त्यांनी समाजमाध्यमांवर एक चित्रफीत प्रसारित करत कुठलाही गुन्हा नसताना माझ्यावर खोटा गुन्हा नोंदविल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कोण आहे कि ज्याला हा विकृत आनंद घ्यायचा होता, असेही त्यांनी म्हटले आहे.
‘हर हर महादेव’ या सिनेमालाही आव्हाड यांचा हाच आक्षेप आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेवर दाखविल्या गेलेल्या प्रसंगांनाही आव्हाड यांनी विरोध केला आहे. या चित्रपटाचा व्हिव्हियाना मॉलमधील सिनेमागृहात सुरू असलेला खेळ आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला. या आंदोलनादरम्यान एका प्रेक्षकाला कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याने ते वादात सापडले. जामीन मिळाल्याने त्यांची सुटका झाली आहे.
सुटका होताच त्यांनी समाजमाध्यमांवर एक चित्रफीत प्रसारित केली असून त्यात मारहाण झालेला प्रेक्षक हा आव्हाड यांची काहीच चुक नसल्याचे पत्रकारांना सांगत आहेत. त्यामुळे त्यांची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.याच चित्रफीतसोबत त्यांनी एक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यात कुठलाही गुन्हा नसताना माझ्यावर खोटा गुन्हा नोंदवला.अटकेसाठी उपयोगी नाही असे समजल्यावर त्याच्यात एक खोट कलम टाकले या कलमाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या अटी तोडल्या आणि मला एक रात्र लॉकअपमध्ये बसवले. महाराष्ट्राच्या राजकारणात कोण आहे कि ज्याला हा विकृत आनंद घ्यायचा होता, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.