ठाणे : ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून बांधकामांना अग्निशमन दाखला देण्यात येतो. पण, हा दाखला केवळ हप्ता घेण्यापुरता मर्यादीत राहिला आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुकवारी पत्रकारांशी बोलताना केला आहे. अग्निशमन दाखल्याबाबत आरोप केल्यामुळे पालिकेकडून माझ्यावरच पहिली कारवाई करण्यात येईल, असा उपरोधिक टोला लगावत त्या कारवाईसाठी माझी तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पालिकेची अग्निशमन यंत्रणा सक्षम नसल्यामुळे उंच इमारतींना परवानगी देऊन रहिवाशांचे जीव धोक्यात घालू नका, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
कापुरबावडी येथील ओरियन बिझनेस पार्क या पाच मजल्याच्या इमारतीला लागलेली आग विझविण्यासाठी ठाणे अग्निशमन दलास दहा तासांचा अवधी लागला. शहरात त्याहून उंच म्हणजेच ७२ माळ्यांची इमारत उभी राहत आहे. पालिकेकडे केवळ २३ ते २४ माळ्यांपर्यंत आग विझविण्याची यंत्रणा आहे. परंतु ६९ माळ्यांवर आग लागली तर ती विझविण्यासाठी किती तास लागतील आणि तेथील रहिवाशांचे जीव कसे वाचविले जातील, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे पुरेसे मनुष्यबळच नाही. त्यांच्याकडे आग विझविण्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणाच नाही. त्यामुळे पालिकेचा अग्निशमन विभाग सक्षम नाही. ओरियन बिझनेस पार्कमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेवरून हे स्पष्ट झालेले आहे, असेही आव्हाड म्हणाले.
ठाणे महापालिकेचा अग्निशमन विभाग सक्षम नसतानाही उंच इमारतींना परवानगी कशी दिली जात आहे, असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. तसेच अग्निशमन यंत्रणा सक्षम नसल्यामुळे उंच इमारतींना परवानगी देऊन रहिवाशांचे जीव धोक्यात घालू नका, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून बांधकामांना अग्निशमन दाखला देण्यात येतो. परंतु हा दाखला देण्यासाठी हप्ते घेण्यात येतात. त्यामुळे हा दाखला केवळ हप्ता घेण्यापुरता मर्यादीत राहिला आहे, असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला आहे. अग्निशमन दाखल्याबाबत आरोप केल्यामुळे पालिकेकडून माझ्यावरच पहिली कारवाई करण्यात येईल, असा उपरोधिक टोला लगावत त्या कारवाईसाठी माझी तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.