ठाणे : मुंब्रा भागातील रस्त्यावरच बेकायदा इमारत उभारणीचे काम सुरू असल्याचे थेट प्रक्षेपण राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी रात्री केल्यानंतर ठाणे महापालिकेच्या पथकाने गुरूवारी सकाळी त्याठिकाणी जाऊन इमारतीचे बांधकाम जमीनदोस्त केले. या कारवाईनंतर जमीनदोस्त करण्यात आलेली ‘ती’ इमारत कुणाची अशी चर्चा सुरू झाली आहे.
करोना काळात महापालिका यंत्रणा व्यस्त असल्याची संधी साधत भुमाफियांनी बेकायदा बांधकामे उभारली होती. या बांधकामांविरोधात महापालिकेने विशेष मोहिम हाती घेऊन कारवाई सुरु केली होती. त्यांनी राजकीय दबाब झुगारत बेकायदा बांधकामांवर हातोडा मारला होता. दोन वर्षांपुर्वी ही कारवाई थंडावताच भुमाफिया पुन्हा सक्रिय झाले होते. त्यांनी शहरात बेकायदा बांधकामे उभारणीची कामे सुरु केली होती. अशा बांधकामांवर गेल्यावर्षी हातोडा मारण्यात आला. आता पुन्हा कारवाई थंडावताच भुमाफिया सक्रिय झाले असून या बांधकामांच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासनावर टीका होऊ लागली आहे. अशाच एका मुंब्य्रातील बांधकामावरून राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिकेवर टिका केली होती.
मुंब्रा स्थानकालगत असलेल्या खाडीमध्ये सुरू असलेल्या एका बेकायदा बांधकामाची चित्रफीत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर चार दिवसांपूर्वी प्रसारित केली होती. त्यापाठोपाठ बुधवारी रात्री त्यांनी मुंब्र्यातील मुख्य रस्त्यावर बेकायदा बांधकाम सुरू असल्याचे उघड करत या बांधकामाच्या ठिकाणाहून त्यांनी समाजमाध्यमांवर थेट प्रक्षेपण करून पालिकेची पोलखोल केली होती. अशा इमारतींमुळे मुंब्र्याचे वाटोळे होत असून पाणी आणि पार्किंगची समस्या निर्माण होत असल्याचे सांगत मुंब्य्रातील रस्त्यावर सुरू असलेल्या इमारतीच्या मुद्द्यावरून पालिकेवर टिका केली होती. तसेच या इमारतीप्रकरणी आता काय कारवाई करणार असा प्रश्नही त्यांनी आयुक्त सौरभ राव यांना विचारला होता. दरम्यान, ठाणे महापालिकेचे उपायुक्त मनिष जोशी यांच्या पथकाने गुरूवारी सकाळी त्या परिसरात जाऊन इमारतीचे बांधकाम जमीनदोस्त केले.
हि इमारत कुणाची
मुंब्र्यातील पिंट्या दादा हाऊस समोरील मुख्य रस्त्यावरच बेकायदा इमारत उभारणीचे काम सुरू होते. तरीही या इमारतीवर कारवाई होत नसल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त करत पालिका अधिकाऱ्यांवर टिका केली होती. या टिकेनंतर पालिका प्रशासनाने ही इमारत जमीनदोस्त केली असली तरी, मुख्य रस्त्यावर उभारण्यात येत असलेली ही इमारत कुणाची होती, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.