ठाणे : राहुल गांधी यांचे संसद सदस्यपदाचे निलंबन केल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ फलक लावले आहेत. ‘सुडाचे राजकारण हा देश सहन करणार नाही’ अशा आशयाचे हे फलक असून या फलकांच्या माध्यमातून त्यांनी केंद्र सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचे दिसून येत आहे. तसेच ‘वुईस्टँडविथ राहुल गांधी’ असा हॅशटॅगही फलकांवर दिला आहे.
राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ मध्ये कर्नाटकाच्या कोलार येथे जाहीर सभा घेतली होती. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. या रॅलीत त्यांनी मोदींची तुलना थेट नीरव मोदी आणि ललित मोदी यांच्याशी केली होती. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी सर्वांची आडनावे एक समान कशी? सर्व चोरांची नावे मोदी का असतात? असे राहुल यांनी सभेत म्हटले होते. या प्रकरणी सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर त्यांना जामीनही दिला. तसेच राहुल गांधी यांना उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदतही दिली होती. दरम्यान दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाल्यामुळे राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटू लागले असून, आक्रमक झालेले काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलने करीत आहेत.
हेही वाचा – कल्याणमध्ये बेकायदा बांधकामाच्या खड्ड्यात बुडून मुलाचा मृत्यू
हेही वाचा – राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ कल्याणमध्ये काँग्रेसचा मोर्चा
राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आल्याबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांमधून निषेध व्यक्त होत असून, राहुल यांच्याविरोधात भाजपाकडून आंदोलने केली जात आहेत. असे असतानाच, महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राहुल यांच्या समर्थनार्थ ठाणे शहराच्या विविध भागांमध्ये फलक लावले आहेत. भारत जोडो यात्रेमधील काही छायाचित्रे वापरून हे फलक तयार करण्यात आले असून, छायाचित्रांखाली ‘सुडाचे राजकारण हा देश सहन करणार नाही’ असा संदेश लिहिला आहे. शिवाय, ‘वुईस्टँडविथ राहुल गांधी’ असा हॅशटॅगही दिला आहे. या फलकांची संपूर्ण ठाणे शहरात चर्चा सुरू आहे.