कळवा येथील न्यू शिवाजीनगर परिसरातील एका चाळीतील भाडेकरूने हाती घेतलेले घर दुरुस्ती आणि वाढीव मजल्याचे बांधकाम थांबविणाऱ्या घरमालकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, नगरसेवक महेश साळवी या दोघांसह चार जणांविरोधात गुरुवारी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी सखोल चौकशी केल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
न्यू शिवाजीनगर येथील ठाकूरपाडा परिसरात मुकुंद ठाकूर राहत असून, त्यांची याच परिसरात ‘बंधुप्रेम’ नावाची नऊ खोल्यांची चाळ आहे. या चाळीतील एका खोलीत समीर डोंगरे राहत असून ते बाहेरगावी गेले आहेत. मात्र त्यांनी बाहेरगावी जाण्यापूर्वी सुरेश पंडित या ठेकेदाराला घर दुरुस्ती तसेच त्यावर एक मजल्याचे वाढीव बांधकाम करण्याचे काम दिले आहे. पंडित यांच्यामार्फत जितू कोळी आणि समीर खोसे हे दोघे घराचे बांधकाम करीत आहेत. दरम्यान, मुकुंद यांच्या पत्नी बिंदिया आणि वहिनी हेमलता या दोघींनी हे बांधकाम थांबविण्यास सांगितले. यावरून झालेल्या वादातून आमदार जितेंद्र आव्हाड आणि नगरसेवक महेश साळवी या दोघांनी घरमालक मुकुंद यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुकुंद यांनी दिलेल्या तक्रारीवरून चौघांविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, यामध्ये आमदार आव्हाड, नगरसेवक साळवी, जितू कोळी आणि समीर खोसे या चौघांचा समावेश आहे. यासंदर्भात कळव्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे.व्ही. बाबर यांनी चौकशीनंतरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader