ठाणे : राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पाचपाखाडी भागात प्रति तुळजापूर मंदीर उभारले आहे. या मंदिराचा लोकार्पण ३० एप्रिलला होणार आहे. मागील तीन वर्षांपासून या मंदिराच्या निर्माणाचे काम सुरु होते. या मंदिराचे पाषाण तामिळनाडूतून आणले आहेत. तर मंदिराच्या पाषाणावरील कोरीव काम कर्नाटकमध्ये झाले आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. मी देवीभक्त आहे. हातून काहीतरी चांगले घडावे याच उद्देशाने हे मंदीर बांधल्याचेही त्यांनी सांगितले.

मंदिराच्या बांधकामाचे चित्रीकरण जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम या खात्यावर प्रसारित केले आहे. त्यावेळी त्यांनी मंदिराची भव्यता चित्रीकरणातून दाखविली. यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मंदिरासाठी जागा मिळाल्यानंतर येथे तुळजा भवानी देवीचे मंदिर बांधले.

या मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे पाषाण तामिळनाडूमधून आणण्यात आले आहेत. तर पाषाणावर कोरीव काम कर्नाटकमध्ये झाले आहे. मंदिराच्या बाजूस ३२ गजमुख आहेत. अतिशय मेहनतीने मागील तीन वर्षांपासून हे काम सुरु होते. आता हे काम पूर्णत्त्वास आले आहे. मी मोठा देवी भक्त आहे.

तुळजापूर आणि जेजूरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलस्वामीनी, कुलदैवत आहे. या दोन्ही देवांवर प्रचंड भक्ती आणि श्रद्धा असणारा मी आहे. माझ्या हातून काहीतरी चांगले घडावे याच उद्देशाने हे मंदीर बांधले. माझ्या मनात प्रती तुळजापूरची कल्पना आहे.

या मंदीराचा लोकार्पण सोहळा ३० एप्रिलला आहे. एक चांगले मंदीर, लोकांसाठी श्रद्धेचे स्थान लोकांसाठी ३० तारखेला खुले होणार आहे. सर्वांना देवीची भक्ती करण्यास आवडते. त्यामुळे २७ ते ३० एप्रिल या चार दिवसांत विविध कार्यक्रमांचे आयोजन आहे. प्रति तुळजापूर निर्माण होत आहे. त्याच्या उद्घाटनाचे साक्षीदार होऊया असेही आव्हाड म्हणाले. पाचपाखाडी भागात बांधलेले हे भव्य मंदिर ठाणेकरांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे.