ठाणे : ९० वर्षांचे वडील रुग्णालयात बिछाण्यात पडले असताना लोक उधारी काढून रुग्णालयाचे देयक भरतात आणि वडिलांना वाचविण्याचा प्रयत्न करतात. परंतु हे जेव्हा बघावे तेव्हा साहेब कधी जातात याच मार्गावर असतात असा आरोप राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला.
राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. ९० वर्षांचे वडील रुग्णालयात बिछाण्यात पडले असताना लोक उधारी काढून रुग्णालयाचे देयक भरतात आणि वडिलांना वाचविण्याचा प्रयत्न करतात. परंतु हे जेव्हा बघावे तेव्हा साहेब कधी जातात याच मार्गावर असतात. असा आरोप अजित पवार यांच्यावर आव्हाड यांनी केला. ज्यांनी अंगाखांद्यावर खेळवले त्यांच्या मरणाची इच्छा व्यक्त करणे याला काय म्हणणार? यांना माणूसकी आहे का असा प्रश्नही त्यांनी केला.
छगन भुजबळ यांना शरद पवार यांनी सर्वकाही दिले. त्यावेळी पवार साहेबांनी त्यांना बोलावून घेतले. त्यांना विधान परिषद दिली. त्यामुळे शरद पवार यांचे काँग्रेसमध्ये नाव बदनाम झाले. कारण, त्यावेळी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला. यांच्यामुळे काँग्रेस हायकमांडमध्ये शरद पवार यांच्याबद्दल गैरसमज निर्माण झाले होते अशी टीका छगन भुजबळ यांच्यावर केली. शरद पवार यांनी ठरविले तर हे सर्व घरात बसतील असेही ते म्हणाले.