ठाणे : छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखणारे जे मनुवादी आहेत, तेच असा विकृत इतिहास सांगत आहेत. जेम्स लेनला चुकीची माहिती मनुवाद्यांनीच दिली होती. आता उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या कानातही याच मनुवाद्यांनी चुकीचा इतिहास सांगितला आहे, असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. महाराज एवढे लहान नव्हते की ते फक्त एक छावणी लुटायला जातील. त्यामुळे आपणाला याचे उत्तर हवंय आणि त्यासाठी आपण पुस्तके घेऊन समोरासमोर बसू, असे खुले आव्हान आव्हाड यांनी फडणवीस यांना दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतमधील एक छावणी लुटली होती, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यासंदर्भात आव्हाड यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला. शिवाजी महाराजांनी सुरत एकदा नव्हे तर दोनदा लुटली आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले की शिवाजी महाराज यांनी सुरतमधील एक छावणी लुटली. यामुळे चुकीचा इतिहास सांगून महाराजांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याची प्रतिक्रिया आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. मनुवादी लोक मुद्दामहून इतिहासाचे विकृतीकरण करून समाजामध्ये संभ्रम कसा निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करीत आहेत. आमच्या राजांच्या इतिहासाशी खेळू नका. आम्ही ते कधीच सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा – खड्डे, गणपती आगमन मिरवणुकांमुळे कल्याण-डोंबिवली वाहन कोंडीत

हेही वाचा – डोंबिवलीतील देवीचापाडा खाडी किनारी कांदळवनावर भराव टाकणाऱ्या भूमाफियांवर गुन्हा

इतिहासात नोंदी आहेत की एक छावणी नाही तर संपूर्ण सुरत लुटली. त्यानंतर अनेक व्यापारी तिथून परागंदा झाले. सुरतेचा हा इतिहास तत्कालीन अनेक बखरींमध्ये आहे. असे असताना महाराजांना छोटं करण्याचा हा मनुवादी विचार देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या हुशार माणसाच्या मेंदूमध्ये कोणी घातला. शिवरायांच्या बुद्धीचातुर्यावर, शौर्यावर, युद्धचातुर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची गरजच नव्हती. पुतळा पडला म्हणून प्रश्न दुसरीकडे वळविण्याचा तर प्रयत्न नाही ना? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. महाराजांनी दोनवेळा सुरत लुटली. पण, दोन्हीवेळा रक्तपात, अत्याचार झाला नाही की स्त्रियांशी कोणीही बेअदबी केली नाही. परंतु आता सुरत लुटीचा चुकीचा इतिहास सांगितला जात आहे. ज्यांचे गुजरातप्रेम ओसंडून वहात आहे ते सुरत लुटीला चुकीचे ठरवत आहेत. पण, सुरत लूट ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची निशाणी आहे. महाराजांनी इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डच, ह्यांच्या वखारीही लूटल्या मग एकच छावणी लुटली असे कसे म्हणता येईल, असेही ते म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad comment on devendra fadnavis on his statement on shivaji maharaj what did he say ssb