राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटलांवरील शाईफेक प्रकरणावर भाष्य केलं. चंद्रकांत पाटलांवर झालेली शाईफेक चुकीचीच होती, पण शाईफेक करणाऱ्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रात आग लावण्याचं काम केलं, असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं. तसेच हा गुन्हा दाखल करून समाजाला पेटवण्याचं काम केल्याचा आरोप केला. ते रविवारी (११ डिसेंबर) ठाण्यात माध्यमांशी बोलत होते.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “माझ्याविरोधात ठाण्यात कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल झाला तेव्हाच लक्षात घ्यायला हवं होतं की, महाराष्ट्रात आता खोटे गुन्हे दाखल करण्याची परंपरा सुरू झाली आहे. पोलिसांच्या हातात काहीच राहिलेलं नाही. वरून आदेश येतात आणि गुन्हे दाखल होतात.”
“यांनी महाराष्ट्रात आग लावण्याचं काम केलं”
“मी वकिलांशी बोललो आहे. ३०७ च्या कोणत्याही व्याख्येत किंवा संज्ञेत शाईफेकीचा गुन्हा बसतच नाही. आपल्या गावरान भाषेत खूनाचा प्रयत्न म्हणजे कलम ३०७ आहे. हा प्रकार ३२३ मध्येही बसू शकत नाही. उलट यांनी समाजाला पेटवण्याचं काम केलं आहे, महाराष्ट्रात आग लावण्याचं काम केलं आहे,” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.
“सरकारने मोठेपणा दाखवून हे गुन्हे ताबोडतोब मागे घ्यावेत,” अशी मागणीही जितेंद्र आव्हाडांनी केली.
हेही वाचा : “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतील तुला माहीत आहे ना मी हे करू शकत नाही”, जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट चर्चेत
“आंदोलन करण्यासाठी कोणी पेटवावं लागत नाही”
राष्ट्रवादीच्या एका व्यक्तीवर या आंदोलनावरून आरोप झाले आहेत. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “आंदोलन करण्यासाठी कोणी पेटवावं लागत नाही. आग मनात लागावी लागते. मनात आग लागली की आपोआप सगळं होतं.”