राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॅा. जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेपार्ह पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळेच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना अशा लोकांची तोंड बंदच करायला पाहिजे, असं मत व्यक्त केलं. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं म्हणून कोणाच्या व्यंगावर किंवा आजारावर बोलण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केलं.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “आम्ही निर्णय घेतला तर अशांची तोंडं बंद करायला वेळ लागत नाही. तुम्हाला व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात. मात्र, कोणाच्या व्यंगावर, आजारावर बोलण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य नाही. कायद्याने त्याला बंदी आहे. तुम्ही कायद्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिव्या घालू शकत नाही.”
“नवबौद्ध फुकट येण्यासाठी जयंती साजरी करण्यासाठी येतात असं तुम्ही म्हणू शकत नाही. हे म्हणण्याचे धारिष्ट्य दाखवणे म्हणजे भारतीय संविधानाला आव्हान देणं आहे. मला वाटतं अशी थोबाडं गप्पच केली पाहिजे,” असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं.
एमआयएमच्या शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी एमआयएमच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरही मत व्यक्त केलं. एकीकडे एमआयएमच्या सभेला भरगच्च उपस्थिती लाभत आपली तरी मुंब्र्यात मात्र वेगळेच चित्र दिसत आहेत. मुंब्र्यातील शेकडो एमआयएम कार्यकर्ते एक वेगळेच नगरसेवक निवडणूकीत उभे असलेले इक्बाल भाई मुलानी यांनी असंख्य कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “कुठलाही पक्ष जेव्हा काम करतो तेव्हा गरीबांना त्याच्याविषयी आस्था, आपुलकी वाटू लागते. जो पक्ष सर्वसामान्यांच्या मदतीला आपणहून धावतो तेव्हा लोक स्वतःहून या पक्षात जायला पाहिजे असा विचार करतात. तसंच ठाणे, मुंब्रा, कळवा या भागात घडतं.”