jitendra awhad criticizes police : शेवटी तुम्हाला समजले असेल की महाराष्ट्र पोलिसांनी तुम्हाला माहीत असलेल्या कारणांमुळे त्यांची विश्वासार्हता गमावली आहे, अशी टिप्पणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बदलापूरच्या घटनेवरून पोलिसांवर केली आहे. तसेच या प्रकरणासाठी तपासाकरिता पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांची नियुक्ती केल्याबद्दल त्यांनी सरकारला धन्यवादही म्हटले आहे.

बदलापुरातील आदर्श शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर देशभरात संताप व्यक्त होत आहे. मंगळवारी शहरात मोठा जनक्षोभ उसळल्यानंतर बुधवारी शहरात तणावपूर्ण शांतता होती. या घटनेनंतर पोलिसांच्या कारभारावर टीका होत आहे. तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाजमध्यमांवर प्रतिक्रिया नोंदवत संताप व्यक्त केला होता. बदलापुरात जे काही झाले, ते पोलीस आणि शाळेची चूक आहे. त्या कन्यांचे झालेले शारीरिक शोषण आणि यापुढे त्यांना होणारा मानसिक त्रास, याची सरकार भरपाई करणार आहे का? असा संताप त्यांनी व्यक्त केला होता. सरकारने आता तरी शहाणे व्हावे. कळव्यातही एका दिव्यांग (गतिमंद) मुलीवर असाच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. कायद्याची भीतीच राहिलेली नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र बंद होऊ नये, अशी आपली इच्छा असेल तर बदलापूरचे प्रकरण संवेदनशीलपणे सांभाळा; तिथे पोलिसी अतिरेक झाला तर मात्र वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यापाठोपाठ आता त्यांनी पुन्हा समाजमध्यमांवर आणखी एक प्रतिक्रिया व्यक्त करत पोलीस आणि सरकारवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – डोंबिवली ते कसारा परिसरातील २० हजारांहून अधिक प्रवाशांचा काळ्या फिती लावून रेल्वे प्रवास

हेही वाचा – बदलापूरातील चिमुकलीच्या प्रकृतीची अफवा अन् रेल्वे स्थानकांवरील बंदोबस्तात वाढ, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे ठाणे पोलिसांचे आवाहन

शेवटी तुम्हाला समजले असेल की महाराष्ट्र पोलिसांनी तुम्हाला माहीत असलेल्या कारणांमुळे त्यांची विश्वासार्हता गमावली आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे. या प्रकरणासाठी तपासाकरिता पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांची नियुक्ती केल्याबद्दल त्यांनी सरकारला धन्यवाद म्हटले आहे. मला आशा आहे की तुम्हाला तिच्या अपमानाबद्दल माहिती असेल आणि तुम्ही उत्कृष्ट काम कराल, याची खात्री आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.