ठाणे : शरद पवार आणि छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, हे कुणालाही सांगता येणार नाही आणि हे दोन्ही नेते कुणाला सांगणारही नाहीत. पण, या दोन्ही नेत्यांच्या भेटीतून राज्यातील प्रगल्भ राजकीय संस्कृतीचे दर्शन घडविले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सत्ताधाऱ्यांना आरक्षण द्यायला जमत नसेल, त्यांनी राजीनामा दयावा, असे सांगत आम्ही आता लवकरच सत्तेत येऊ आणि त्यानंतर आरक्षण देऊ, असा दावाही त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजच्या घडीला विरोधी पक्षांना विचारातच घेतले जात नाही. मराठवाडा विद्यापीठ नामांतरणाचा विषय पुढे आला होता, त्यावेळेस सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित बसून निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी केली होती. आताही आरक्षणाचा इतका मोठा प्रश्न पुढे आल्यावर सर्व पक्षांना एकत्रित आणून तोडगा काढला पाहिजे होता. परंतु सरकारला आरक्षणाचे श्रेय घ्यायचे होते. त्याच्यातील एकजण ओबीसींबरोबर तर दुसरा मराठ्यांबरोबर बोलणी करत होता. पण, त्यांच्याशी काय बोलणी होते, हेच आम्हाला समजले नाहीतर आम्ही त्यावर काय बोलणार, असे आव्हाड म्हणाले. आरक्षणाच्या जाळ्यात आम्हाला अडकविण्याचा सरकारचा डाव होता. पण, तेच या जाळ्यात अडकले असून सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी सरकारची अवस्था झाल्याचा आरोप त्यांनी केला. शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी भुजबळ हे गेले असतील तर त्यात चुकीचे काय आहे. उलट या भेटीतून भुजबळ यांनी त्यांच्या पूर्वश्रमीच्या नेत्याबद्दल काळजी दाखवल्याचे दिसून येते. शरद पवार म्हणजे जादू ची कांडी आहे. त्यामुळेच त्यांच्याशी चर्चा केली जात आहे, असेही आव्हाड म्हणाले.

हेही वाचा……तर मुरबाड विधानसभा लढवेन, माजी मंत्री कपिल पाटील यांच्या वक्तव्याने खळबळ

अजित पवारांवर टिका

माझ्या मतदार संघातील विकास कामांचा निधी अडविण्याची राजकीय भुमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कधीच घेतली नाही. परंतु अजित पवार हे मला हरविण्यासाठी काय करतात, हे मला सांगायचे होते आणि ते निधी देत नसल्याचे मी सांगितले आहे. आता अर्थ नियोजन विभागातून मला निधी नकोच आहे. आधी स्वत:च्या मतदार संघातील सभा यशस्वी करा आणि त्यानंतर दुसऱ्याच्या मतदार संघात लक्ष घाला. ५ कोटी रुपये देऊन आमदार विकत घेऊ शकता पण, ५० कोटी खर्च करून जनता आणू शकत नाही, अशी टिका आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर केली.

हेही वाचा…कोंडीमुळे कल्याण पश्चिमेतील रस्ते, चौकांमध्ये वाहनांचा रांगा

पारसिक चौपाटीचे लवकरच पुर्ण

पारसिक- मुंब्रा येथे रेतीबंदर चौपाटीचे काम अंतिम टप्प्यात आले असून पुढील दोन ते तीन महिन्यांत या चौपाटीचे काम पूर्णत्वास येणार आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करतील, तो त्यांचा अधिकार आहे, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. मी स्वप्न दाखवत नाही तर ते सत्यात उतवतो, मी आश्वासन देत नाही तर मी काम करतो अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटावर टिका केली. आम्ही केवळ निधी आणतो असे म्हणत नाही तर प्रस्ताव तयार करुन मंजुर करुन ती कामे पूर्ण करतो असेही ते म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad defends sharad pawar chhagan bhujbal meeting criticizes ajit pawar s political moves project psg
Show comments