Jitendra Awhad fights with NCP-SCP Leader Yunus Shaikh : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आता महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आता केवळ काहीच तास बाकी आहेत. महाविकास आघाडी, महायुती व इतर पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत असून उमेदवार देखील त्यांचे अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करत आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वेगवेगळे पक्ष व उमेदवार एकमेकांवर टीका-टिप्णणी करत आहेत, कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात एक गंभीर घटना घडली आहे. या पक्षातील दोन मोठे नेते आपसात भिडल्याचं नुकतंच पाहायला मिळालं.

माजी मंत्री व भिवंडीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पॅम्फ्लेटवर फोटो न छापल्यामुळे नाराज झालेल्या अल्पसंख्यांक विभागाचे नेते युनूस शेख यांनी आव्हाडांसमोर नाराजी व्यक्त केली. यावेळी दोघांमध्ये शा‍ब्दिक बाचाबाची देखील झाली. या दोघांमध्ये भर चौकात बाचाबाची झाली असून दोघांमधील वादाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

हे ही वाचा >> Supriya Sule : भाऊबीजेला अजित पवारांची वाट बघणार का? सुप्रिया सुळेंचं उत्तर, “प्रेम असतं तेव्हा…”

मुंब्र्यात नेमकं काय घडलं?

एएनआय या वृत्तसंस्थेने दोघांमधील वादाचा व्हिडीओ एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार ही घटना २७ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंब्रा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी घडली आहे. आव्हाड त्यांचा प्रचार करत असताना त्यांच्या पक्षाच्या राज्य अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष युनूस शेख यांच्याबरोबर बाचाबाची झाली. दोघांमध्ये नेमका कशावरून वाद झाला हे स्पष्ट नसलं तरी व्हिडीओत दिसतंय की दोघेही हाणामारी करेपर्यंत एकमेकांशी वाद घालत होते. इतर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर दोघांमधील वाद निवळला. इतर कार्यकर्त्यांनी त्यांना कॅमेऱ्यांपासून दूर नेलं.

हे ही वाचा >> Ajit Pawar : ‘मी केलेली चूक त्यांनी करायला नको होती’; अजित पवारांचं बारामतीत शरद पवारांबाबत मोठं विधान

शरद पवारांच्या पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

जितेंद्र आव्हाडांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी स्वतःचा जाहीरनामा (मतदारसंघासाठी) प्रसिद्ध केला आहे. त्याचे पॅम्फ्लेट्स मतदारसंघात वाटले जात आहेत. या जाहीरनाम्यावरूनच आव्हाड व युनूस शेख यांच्यात वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. या दोघांमध्ये याआधीपासूनच संघर्ष चालू होता जो या निवडणूक काळात चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं.