ठाणे – माझ्याकडे खोके नाहीत. पण, माझ्याजवळ एकच मोठे धन आहे, ती म्हणजे शरद पवारांच्या चरणी वाहिलेली निष्ठा. ती निष्ठा कोणीही विकत घेऊ शकत नाही, असे वक्तव्य करत राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. तसेच पैशाने आमदार आणि खासदार विकत घेता येतील, मात्र लोकशाहीमध्ये जनता विकत घेता येणार नाही. कारण जनता कधीही स्वतःला विकत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे येथील संघर्ष संस्थेच्या वतीने कळवा येथे ठाणे आर्ट फेस्टिवल २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.

मागील काही दिवसांपासून ठाण्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना यांच्यामध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. नुकत्याच कळवा आणि मुंब्रा येथे झालेल्या विकास कामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर विकास कामांचे श्रेय लाटत असल्याची टीका केली होती. तसेच मागील काही दिवसांच्या कालावधीत जितेंद्र आव्हाड यांच्यावर काही गुन्हेदेखील दाखल झाले आहेत. या सर्व गोष्टींवर जितेंद्र आव्हाड यांनी या महोत्सवातून भाष्य केले.

हेही वाचा – आनंद आश्रमाचा यांनी बाजार केलाय, केदार दिघे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

सध्याच्या राजकारणात बोलण्यासारखे काही राहिलेले नाही. गेल्या सहा महिन्यांत माझ्यावर चार केस टाकण्यात आल्या. त्यातली एकही केस खरी नाही. कारण मला जामीन देताना न्यायाधीशांकडून ही केसच नसल्याचे सांगण्यात आले होते. माझ्यावर पहिला गुन्हा दाखल केला तेव्हा अस्तित्वात नसलेल्या कायद्यान्वये मला जेलमध्ये टाकण्यात आले. याच पद्धतीने इतर गोष्टी करण्यात आल्या. मात्र दुसरीकडे ठाण्यातील एक अधिकारी दाऊदचा साथीदार सुभाष सिंग ठाकूर यांच्या मदतीने माझी मुलगी आणि जावयाला संपवायच्या गोष्टी करत आहे, त्यावर मात्र पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही, असे आव्हाड यावेळी म्हणाले. माझ्यावर कितीही गुन्हे टाकले तरी माझी निष्ठा तुम्ही विकत घेऊ शकत नाही. माझ्याकडे खोके नाहीत. माझ्याजवळ एकच मोठे धन आहे, ती म्हणजे शरद पवारांच्या चरणी वाहिलेली निष्ठा. ती निष्ठा कोणीही विकत घेऊ शकत नाही, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षपणे लगावला.

मृत्यूला घाबरत नाही. आज तुमची सत्ता आहे, उद्या आमची सत्ता असेल. हे सगळ्यांनी लक्षात ठेवावे. लोकशाहीमध्ये सर्वाधिकार जनतेकडे असतात. तुम्ही पैशांनी खासदार आमदार विकत घेऊ शकता. मात्र जनता विकत घेऊ शकत नाही. कारण जनता स्वतःला विकत नाही. सध्या अनेक नेते ठाण्यात येतात आणि म्हणतात की, जितेंद्र आव्हाडला संपवून टाकू, त्याचा अंत करून टाकू. मात्र ते अशा विभागातून येतात, जिथे विकासाच झाला नाही. असे वक्तव्य करत त्यांनी नरेश म्हस्के यांच्यावरही निशाणा साधला. तर महाराष्ट्रात दादागिरीचे राजकारण चालू आहे, हे राजकारण महाराष्ट्र जास्त दिवस सहन करणार नाही, असेही जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

हेही वाचा – निवडणूक आयोगाचा निकाल कोणत्यातरी पक्षाच्या कार्यालयातून लिहून आला, शिवसेना नेते भास्कर जाधव यांची टीका

हिरानंदानी पेक्षा पारसिक उजवे –

कळव्यात आता बाहेरचे अनेक लोकदेखील यायला लागले आहेत. हिरानंदानी मेडोजमध्ये राहणारेदेखील इकडे येत आहे. ठाणे रेल्वे स्थानकापासून हिरानंदानी मेडोजपर्यंत जायला एक ते दोन तास आणि पारसिक नगरमध्ये यायला केवळ काही मिनिटे लागतात. कळव्यात अनेक विकासकामे झाली आहेत. हिरानंदानीला पारसिक नगरने मागे सोडले आहे. हिरानंदानी भागात जाताना खड्डे लागतात, रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. तेथील रहिवाशांना पाणी मिळत नाही, त्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. परंतु, आपल्या कळवा गावात मुबलक पाणी येत आहे. कळव्यातील सर्व सोसायटीमध्ये रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे. २००९ मध्ये मी जी विकास कामांची आश्वासने नागरिकांना दिली होती, ती सर्व आश्वासने मी पूर्ण केली आहेत. यासर्व विकास कामांमुळे घरांना चांगल्या किमती आल्या आहेत. येत्या काळात मुंब्रा आणि कळवा खाडीवरील चौपाटीमुळे या भागाचे रूप पालटणार आहे, असेही जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad indirect comment on cm eknath shinde in thane says no one can buy my loyalty ssb