ठाणे : राबोडीतील मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांची हत्या कोणी केली, असा प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस अधिकारी नितीन ठाकरे यांची नेमणुक करा, असे आव्हान राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला दिले. खोट्या केसेस, तक्रारी केल्या जात असून कोणत्याही पदावर नसताना एकच माणून पालिका चालवित आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
अभिजीत पवार हा मला पहिल्यांदाच घाबरलेला दिला. त्याच्या बाबतीत झाले ते वाईट झाले. पण, आता महाराष्ट्रात हे बंद व्हायला हवे. आमच्या पक्षाचा मुंब्य्रात शमीन खान नावाचा अध्यक्ष आहे. त्यालाही गेले वर्षभर असाच त्रास दिला जातोय. कोणीतरी फोन करतो, कधीतरी दुबई वरून फोन येतो. कधीतरी आयकर अधिकाऱ्याचा फोन येतो. हे काय चालले आहे आणि हे सर्व कोण चालवतोय. एका परमारचा जीव आधी घेतलाय आणि त्यामुळे एक घर बरबाद झाले आहे. जमील शेखचा खून झाला आहे. त्याच्या मुली दहावीची परिक्षा देत आहेत. परिक्षेचे शुल्क देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. अशी आणखी किती घरे बरबाद करणार आहात, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.
मला अडकावयचे असेल तर मी तयार आहे, करा माझ्या संपत्तीची खुली चौकशी असे थेट आव्हानही आव्हाड यांनी दिले. जमील शेख यांच्या खूनाचा तपास पुन्हा सुरु करा अशी मागणी करत त्याचा तपास करण्याची हिम्मत असेल तर नितीन ठाकरे या पोलीस अधिकाऱ्याची नेमणुक करा, असे आव्हानही त्यांनी दिले. आज महापालिकेत कोणतेही पद नसताना कार्यालये वापरली जात आहेत. त्यासाठी पालिकेचे कर्मचारी जुंपलेले आहेत, हे सर्व महापालिका आयुक्तांना दिसत नाही का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शहर विकास विभागात जायचे, सर्वांच्या कुंडल्या काढायच्या आणि त्यांना घाबरविण्याचे काम करायचे एवढेच काम शिल्लक राहिले आहे. केवळ आपल्याला आमदार व्हायचे आहे, म्हणून धमकावून, घाबरवून स्वत:च्या गटात घेण्याचे घाणेरडे राजकारण केले जात असून अजित पवार यांनी आता तरी डोळे उघडावेत, असे आव्हाड म्हणाले.
आरोपीला जेवण आणि फोन
ठाणे जेलमध्ये जमील शेख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी आहेत. त्यांना बाहेरून फोन आणि जेवण पुरविले जात आहे. जेलमधील उपहारगृह देखील राबोडीतील एक जण चालवत असून त्याच्यामार्फत आरोपींना या सुविधा पुरविल्या जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. एकनाथ शिंदे हे पालकमंत्री असतांना त्यांनी देखील एकाला सहकार्य केले होते. परंतु त्यांच्या कदाचित हे लक्षात आले नसेल की तो आज एक भस्मासुर झाला आहे, अशी टिकाही त्यांनी केली.