छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधाने केली होती. या विधानानंतर महाराष्ट्रात कोश्यांरीविरोधात रोष वाढला होता. तर, कोश्यारींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त होती. अशातच आज ( १२ फेब्रुवारी ) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. यावर ‘गेले सुटलो एकदाचे, देर आये दुरुस्त आये,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “राजभवन हे भाजपाचं कार्यालय बनलं होतं. काही झालं तरी राजभवनात जायचं, तिथून चौकशी लावल्या जात. सत्ता ज्यांच्याकडे असते, ते पाहिजे तसा वापर करुन घेतात. ही काहींची मानसिकता असते. काँग्रेसच्या काळात राज्यपालांना स्वातंत्र्य होतं. मात्र, आताच्या काळात नाही.”
हेही वाचा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजुरीवर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“कोश्यारी गेले, सुटलो एकदाचे… पण देर आये दुरुस्त आये… कोश्यारी हे माफी मागणाऱ्यांमधील नव्हते. कोश्यारी म्हणाले की महाराष्ट्राचं बुद्धिजिवी लोकांनी नुकसान केलं. त्यामुळे कोश्यारींच्या मनात काय होतं, याचा राज्याने विचार करावा. महाराष्ट्रातील लोकांनी गुराढोरासारखं वागलं पाहिजे. तसेच, एकाच विचारांच्या मागे लोकं गेली पाहिजे, असं त्यांच्या मनात होते. आता नवीन राज्यपाल काय प्रताप करतील, ते पाहूया,” असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.