Akshay Shinde Encounter : पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे ठार झाल्याची माहिती आहे. त्याला चौकशीसाठी नेत असताना ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनीही स्वरक्षणार्थ गोळीबार केला. या गोळीबारात अक्षय शिंदे ठार झाला. दरम्यान, या घटनेनंतर आता विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावर राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट ) आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया देत या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहेत.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

“सर्वप्रथम बदलापूरमधील शाळेने हा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला. हासुद्धा एक गुन्हा आहे. या शाळेच्या संचालिकांविरुद्ध अद्याप कारवाई झालेली नाही. याप्रकरणी पोलीस तक्रारही उशीरा दाखल करण्यात आली. त्यानंतर अक्षय शिंदेला अटक झाली. आता त्याला ठार करण्यात आलं. एकंदरिच हे प्रकरण संशयास्पद आहे. अक्षय शिंदे हा या प्रकरणातील मुख्य आरोपी होता. त्याला फाशी द्यायला हवी होती. काद्यानुसार त्याला फाशी दिली असती, तर महाराष्ट्रालाही आनंद झाला असता. पण अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर याप्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

हेही वाचा – “गृहविभागाने दाखवलेला हलगर्जीपणा…”, अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

“या प्रकरणामुळे अक्षय शिंदेला अधिकची काही माहिती होती का? यात कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अक्षय शिंदेला मारण्यासाठी जी युक्ती लढवली आहे. त्यामुळे संशय निर्माण झाला आहे. तसेच पोलिसांवरचा विश्वास उडाला आहे”, असेही ते म्हणाले.

“खरं तर याप्रकरणात अनेक मोठ्या व्यक्तींचा समावेश आहे. त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी देण्यात आला, असं माझं स्पष्ट मत आहे. याप्रकरणात बदलापूरमधील शाळेशी संबंधित आपटे नावाची व्यक्ती फरार आहे. त्याच्याविषयी अक्षय शिंदेला बऱ्याच गोष्टी माहिती होत्या, त्याला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला मारण्यात आलं”, अशा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला.

हेही वाचा – बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

दरम्यान, यासंदर्भात बोलताना पोलिसांनी स्वरक्षणार्थ गोळीबार केला, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. याबाबत विचारलं असता, “पोलिसांनी स्वरक्षणासाठी गोळीबार केला असेल, पण त्यापूर्वी आरोपीच्या हातात बंदूक लागली कशी? हा प्रश्न उपस्थित होतो. अशा आरोपींच्या बाजुला चार-पाच पोलीस कर्मचारी असतात. मग तरीही हे का घडलं? अशाप्रकारे आरोपींचा फिल्मीस्टाईलने एन्काऊंटर होत असेल, तर यामुळे सरकारवर संशय निर्माण होतो आहे”, असे ते म्हणाले.