ठाणे : सिडकोने ७२ लाख रुपयांची घरे विक्री करण्यासाठी तब्बल ४०० कोटी रुपयांच्या जाहिराती दिल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केला आहे. भ्रष्टाचाराच्या सीमा पार करणारे हे सरकार असल्याचेही आव्हाड म्हणाले. सिडकोची घरे जाहिरातीत दर्शविलेल्या क्षेत्रफळापेक्षा कमी क्षेत्रफळ असल्याचा आरोप सोडत विजेत्यांकडून केला जात आहे. त्यातच आता आव्हाड यांच्या आरोपानंतर सिडकोच्या कारभाराविषयी विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
नवी मुंबई शहरात आपल्या हक्काचे घर मिळावे यासाठी अनेकजण सिडको गृह प्रकल्पाच्या सोडतीची प्रतिक्षा करत असतात. सिडकोच्या २०२४ मध्ये निघालेल्या ‘माझे पसंतीचे घर’ ही सोडत निघाली होती. या सोडतीमध्ये नवी मुंबईत घर मिळेल या आशेने अनेकांनी अर्ज केले होते. परंतु या सोडतीमध्ये अनेक घरांच्या किमंती या अवाक्याबाहेर होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये या सोडती विषयी नाराजी होती. घराच्या किमंती वाढलेल्या असतानाच, सिडकोने जाहिरातीत दिलेल्या चटई क्षेत्रफळापेक्षा कमी क्षेत्रफळाची घरे उपलब्ध करुन दिल्याचे समोर आले होते. वाशी येथील वन ‘बीएचके’ घरांचे चटई क्षेत्रफळ ३२२ चौ.फूट दर्शविले होते. परंतु लेटर ऑफ इंटेन्ट अर्थात इरादा पत्रात घऱांचे क्षेत्रफळ २९१.९२ चौ. फूट इतकेच दर्शविले होते. याविषयी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) माजी आमदार संदीप नाईक यांनी सिडको प्रशासन तसेच मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. तसेच नागरिकांना जाहिरातीत दिलेल्या क्षेत्रफळाप्रमाणे घरे उपलब्ध करावी अशी मागणी केली होती. आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही सिडकोच्या कारभाराविषयी प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहेत.
विधानसभेत त्यांनी सिडको प्रशासनावर आरोप केले. सिडकोने ७२ लाखांची घरे विकण्यासाठी ४०० कोटी रुपयांची जाहिरात केली आहे. भ्रष्टाचाराच्या सीमा उलटून टाकल्या आहेत. ही घरे विक्री होत नाहीत. ज्यांनी घरांची नोंदणी केली होती. ते लोक आमच्याकडे येऊन आमचे पैसे अडकल्याचे म्हणत आहेत. हे पैसे आम्हाला परत मिळवून द्या अशी मागणी करत आहेत. सिडको हे पैसे देखील देण्यास तयार नाही असा आरोप आव्हाड यांनी केला. लोकांना न्याय कोण देणार? भ्रष्टाचार वाढायला लागला आहे तो थांबविणार कसा असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.