आमचे राजे काय स्त्री लंपट होते का? असा प्रश्न विचारत शिवपुत्र संभाजी राजे यांना स्त्री लंपट आणि दारुड्या म्हणणाऱ्यांना आपण आपले आदर्श मानत आहात. त्यांच्याबद्दल आपले काय म्हणणे आहे? हे अजित पवारांवर टीका करणाऱ्यांनी जाहीरपणे सांगावे, असे आव्हान राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला दिले आहे. तसेच अजित पवारांनी माफी मागावी, अशी मागणी करणाऱ्या भाजपच्या लोकांनी सावरकर आणि गोळवलकर चुकले आहेत, त्याबद्दल आधी माफी मागणार का, अशी विचारणा केली आहे. कमी माहितीच्या आधारावर आपण जेव्हा एखाद्याला कोंडीत पकडायला जातो. तेव्हा तो कोंडीत पकडला जात नाही. तर, इतिहासाची पाने बाहेर येतात. जर, सगळे शांत असते तर आम्ही गोळवलकर आणि सावरकर यांची ही पाने बाहेर काढलीच नसती, असेही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नितेश राणेंकडून अजित पवारांचा ‘धरणवीर’ म्हणून उल्लेख; संभाजी महाराजांवरील विधानानंतर म्हणाले; “थोडीजरी लाज…”

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षकच होते, असे रोखठोक वक्तव्य केले. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटानं तात्काळ आक्षेप घेत आंदोलने सुरु केली आहेत. त्यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी ऐतिहासिक दाखले देत अजितदादांवर टीका करणाऱ्यांवर चांगलीच आगपाखड केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म ही संकल्पना महाराष्ट्र धर्म, मराठा धर्म आणि स्वराज्य असे निर्मिलेले होती. मराठा हा व्यापक शब्द होता. मराठा ही व्यापक संकल्पना होती. त्यामध्ये सर्व समाविष्ठ झाले होते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या राज्याला रयतेचे राज्य असे म्हटले गेले होते. या रयतेच्या राज्याचे वारसदार छत्रपती संभाजी राजे हे होते. त्यामुळे ते कुठल्या एका धर्माच्या रक्षणासाठी बाहेर पडले, असे कोणतेही ऐतिहासिक संदर्भ नाहीत. समकालिन जेवढे इतिहासकार आहेत. त्यामध्ये जेवढे परकिय इतिहासकार आहेत. त्या सर्वांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल खूप चांगले लिहून ठेवले आहे, असे आव्हाड यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन राज्याभिषेक करुन घेतले, असे प्राच्य इतिहासकार प्रा. शरद पाटील यांनी सांगितले आहे. शाक्त म्हणजे काय तर, स्त्रीप्रधान संस्कृतीचा आदर करणे. छत्रपती संभाजी महाराज हे शाक्त परंपरेचे-संस्कृतीचे अभ्यासक होते. त्यामुळे ते स्वराज्य रक्षक होते. या स्वराज्यात आपण सगळेच आलो आहोत. स्वराज्य हे जात-धर्म विरहित होते. ते स्वराज्य रक्षक होते म्हणजेच ते सर्वांचेच रक्षण करायचे ना? कोणत्याही प्राचीन किंवा समकालिन इतिहासकाराने त्यांना धर्मवीर असे कुठेही म्हटलेले नाही.

हेही वाचा >>> “सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीने संभाजीराजे हे स्त्रीलंपट…”, जितेंद्र आव्हाडांचं खळबळजनक ट्वीट

स्वराज्याचे रक्षण ही छत्रपती शिवाजी महाराजांची भावना होती. तीच भावना छत्रपती संभाजी महाराजांचीही होती. जी परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांनी चालविली. तीच परंपरा छत्रपती संभाजी महाराजांनीही चालविली, असेही ते म्हणाले.  ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकामध्ये शिवरायांच्या राज्याबद्दल काय म्हटले आहे हे सांगून मला नवीन वाद निर्माण करायचा नाही. पण, सावरकरांनी सहा सोनेरी पाने या पुस्तकात संभाजी महाराजांबद्दल जे लिहिले आहे ते वाचण्यायोग्यही नाही. “त्यांना मदिरा आणि मदिराक्षीचा नाद होता” असे सावकरांनी लिहिले आहे. तसेच, शिवाजी महाराजांचा नाकर्ता पुत्र असेही सावरकरांनी लिहिले आहे. दुसरे पुस्तक म्हणजे ‘बंच ऑफ थॉट्स’ यामध्ये गोळवलकर म्हणतात की, “संभाजी महाराज हे बाई आणि बाटलीच्या आहारी गेले होते. अन् त्यांची खंडो बल्लाळ यांच्या बहिणीवर वाईट नजर होती.” नाटकाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा राजसंन्यास आणि इथे ओशाळला मृत्यू या नाटकांमध्ये संभाजी महाराजांना स्त्री लंपट आणि दारुडा म्हणून दाखविण्यात आले. याबद्दल कधीच कोणी बोलले नाही. आम्ही वारंवार त्यावर बोलत आलो आहोत. आम्ही पहिल्यापासून छत्रपती संभाजी राजांना स्वराज्य रक्षक असेच म्हणत आहोत, असेही ते म्हणाले. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते, ही बातमी औरंगजेबाला दिली कोणी, येथेच तर खरा इतिहास दडला आहे. म्हणूनच आपण सांगत आहोत की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका! इतिहास वाद वाढवतो, असेही ते म्हणाले. अजित पवार हे संभाजी महाराजांच्या विरोधात बोललेले नाहीत. संभाजी राजांना विशिष्ठ धर्माचे लेबल लावून विकायचे प्रयत्न कधीही झाले नव्हते. समकालिन इतिहासकार काफी खान आणि औरंगजेबाच्या रोजनिशीमध्ये काय लिहून ठेवलेय, तेही वाचा. इतिहासाचा अभ्यास करुन अजित पवारांवर टीका केली असती तर समजू शकतो. पण, निष्कारण इतिहासाला धर्माची जोड देणे बरोबर नाही, असा सल्ला त्यांनी दिला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad slams bjp for protesting against ajit pawar remark on chhatrapati sambhaji maharaj zws