Jitendra Awhad Statement on Badlapur : बदलापुरात जे काही झाले, ते पोलीस आणि शाळेची चूक आहे. त्या कन्यांचे झालेले शारीरिक शोषण आणि यापुढे त्यांना होणारा मानसिक त्रास, याची सरकार भरपाई करणार आहे का? असा संताप सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. निष्कारण आगीत तेल ओतू नका. या प्रकरणामुळे आता महाराष्ट्र बंद करावा लागेल, अशी वेळ आली आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
बदलापूर आंदोलनात सहभागी झालेल्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर भाष्य केले आहे. बदलापूर आंदोलनात सहभागी झालेल्या ३०० जणांवर पोलिसांनी नाहक गुन्हे दाखल करून अनेक जणांना रात्रीच अटकही केली आहे. एकीकडे पोलिसांनीच हा विकृत प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे साहजिकच जनता चिडणार; वर त्याच जनतेला अटकही करणार, हा कुठला न्याय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणामुळे आता महाराष्ट्र बंद करावा लागेल, अशी वेळ आली असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा – डोंबिवली, कल्याणमध्ये प्रवासी धुळीने हैराण
सरकारने आता तरी शहाणे व्हावे. कळव्यातही एका दिव्यांग (गतिमंद) मुलीवर असाच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. कायद्याची भीतीच राहिलेली नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र बंद होऊ नये, अशी आपली इच्छा असेल तर बदलापूरचे प्रकरण संवेदनशीलपणे सांभाळा; तिथे पोलिसी अतिरेक झाला तर मात्र वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.